सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:02 IST2025-12-03T19:01:13+5:302025-12-03T19:02:01+5:30
चार निष्पाप मुलांची हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तिचा स्वतःचा मुलगा देखील आहे.

फोटो - आजतक
हरियाणातील पानिपत येथे पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे, जिने आतापर्यंत चार निष्पाप मुलांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तिचा स्वतःचा मुलगा देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने विशेषतः सुंदर किंवा आकर्षक दिसणाऱ्या मुलांना टार्गेट केलं होतं, त्यांना टब, बाथरूम सिंक किंवा पाण्याच्या इतर कंटेनरमध्ये बुडवून मारलं.
१ डिसेंबर रोजी नौलथा गावात एका लग्न समारंभात सहा वर्षांची मुलगी संशयास्पद परिस्थितीत टबमध्ये मृतावस्थेत आढळली. मुलीची उंची टबपेक्षा खूप जास्त होती, ज्यामुळे घातपाताचा संशय निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, महिलेवर संशय घेतला आणि तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने धक्कादायक खुलासा केला. चार मुलांना मारल्याची कबुली दिली.
२०२३ मध्ये महिलेने सोनीपतच्या बोहड गावात आपल्या नणंदेच्या मुलीला मारला. त्याच वर्षी तिने स्वत:च्या मुलाचाही काटा काढला. २०२५ मध्ये ती माहेरी आली आणि भाचीची हत्या केली. १ डिसेंबर २०२५ रोजी दिराच्या मुलीला मारलं. यानंतर महिला पार्टी करून आनंद साजरा करायची. चौकशीदरम्यान महिलेने उघड केलं की, तिला तिच्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त सुंदर दिसणाऱ्या मुलांचा हेवा वाटत होता.
पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि भयानक आहे, कारण आरोपीने तिचा गुन्हे लपवण्यासाठी तिच्या मुलालाही सोडलं नाही. महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिच्या मानसिक आरोग्य कसं आहे याचाही तपास करत आहे. चार मुलांच्या हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.