अंजनगाव सुर्जी (अमरावती) : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफ झालेल्या लाभार्थींना स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सातेगाव (ता. अंजनगाव सुर्जी) शाखेच्या व्यवस्थापकाकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनुसार, महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. संबंधित लाभार्थींना स्टेट बँकेच्या सातेगाव शाखा व्यवस्थापकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्ज माफ झालेल्या लाभार्थींना अनावश्यक कागदपत्रे मागू नये, अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना असताना सुद्धा संबंधित व्यवस्थापक अनावश्यक कागदपत्रे मागत असल्याने त्यासंबंधीची तक्रार अविनाश विनायक टाक व संतोष जगतराम काळे (रा. सातेगाव) या शेतकऱ्यांनी अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्याकडे केली. तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी सातेगाव येथील स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा अग्रणी (सेंट्रल) बँकेच्या व्यवस्थापकांना २८ जुलै रोजी दिले असल्याने बँक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागितला जातो नकाशा
पीक कजार्साठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानासुद्धा अनेक राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कागदपत्रे मागत आहेत. त्यात शेतीच्या नकाशाचाही समावेश आहे. अंजनगाव सुर्जीच्या भूमिअभिलेख कार्यालयात केवळ नकाशाकरिता ५०० अर्ज आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.