धक्कादायक! पोलीस कारवाईदरम्यान एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 19:34 IST2019-09-25T19:31:06+5:302019-09-25T19:34:40+5:30
पोलिसांच्या मारहाणीमध्ये पारचा याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीय आणि वाल्मीकी समाजाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

धक्कादायक! पोलीस कारवाईदरम्यान एकाचा मृत्यू
मुंबई - धारावी येथे पोलीस कारवाई सुरू असताना ४० वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. सुरेंद्र महावीर पारचा असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वाल्मीकी समाजाने शाहूनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे होते. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
पारचा हा कुटुंबासोबत माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या भावाचे निधन झाले. पारचा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असल्याने मंगळवारी सायंकाळी तो माटुंगा लेबर कॅम्प परिसरात आल्याची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे पोहोचले. पोलिसांना बघून पळत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर पोलिसांच्या मारहाणीमध्ये पारचा याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीय आणि वाल्मीकी समाजाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनास पाठवला, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल; आणि त्यात कोणी दोषी असल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. पारचा याच्या मृत्यूच्या घटनेची नोंद शाहूनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.