आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:59 IST2025-08-10T16:58:13+5:302025-08-10T16:59:00+5:30
चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्...
ओडिशा राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बलांगीर जिल्ह्यातील टिटलागड गावात एका अल्पवयीन मुलावर त्याच्याच धाकट्या भावाच्या हत्येचा आरोप आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीपासून धाकटा मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाल्यानंतर आईने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अखेर तपासाअंती भावानेच हत्या केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय नारायण मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोधल्यानंतर शेवटी त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आयजींच्या सूचनेवरुन तितलागड डीएसपी आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची एक विशेष टीम तयार केली. टीमने बालंगीर, कालाहांडी, नुआपाडा आणि रायपूर जिल्ह्यात व्यापक शोध घेतला, परंतु मूल सापडले नाही.
मोठ्या भावाने केली हत्या
काही दिवसानंतर आईला मोठा मुलगा भुपेशवर संशय आला. तपासादरम्यान, पोलिसांनी मोठ्या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला. आरोपीने कबूल केले की, त्यानेच त्याच्या धाकट्या भावाची चाकू भोसकून हत्या केली आहे. आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर त्याने प्रथम मृतदेह घराच्या मागे पुरला, परंतु नंतर तो बाहेर काढून सुमारे 300-400 मीटर अंतरावर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा पुरला. या माहितीनंतर एसपी आरोपीसह घटनास्थळी पोहोचले आणि दंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करून मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले.
हत्या का केली?
आई-वडील नारायणचे जास्त लाड करायचे, म्हणून भुपेशला आपला धाकटा भाऊ आवडत नव्हता. कुटुंबात यापूर्वीही यावरुन वाद झाले होते. मोठ्या भावाला नेहमी वाटायचे की, लहान भावाच्या जन्मानंतर पालकांचे त्याच्यावरील प्रेम कमी झाले आहे. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात ६ इंच लांब चाकू भोसकून त्याची हत्या केली. आरोपीने हत्येत वापरलेला चाकू आणि दफनविधीदरम्यान वापरलेली साडी पोलिसांनी जप्त केली.