रक्तरंजित व्हॅलेंटाईन डे! मृत्यूपूर्वीचा 'तो' मेसेज; कारमधील तरुण-तरुणीच्या मृतदेह प्रकरणात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:28 IST2026-02-14T16:27:28+5:302026-02-14T16:28:01+5:30
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोएडामध्ये कारमध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोएडामध्ये कारमध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे. कारमध्ये दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, दोघेही गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्यात लग्नावरून वाद सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव असून ती नोएडा सेक्टर-५८ परिसरातील रहिवासी होती. सुमित असं मुलाचं नाव असून तो दिल्लीतील त्रिलोकपुरीचा रहिवासी होता. हे दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि रिलेशनशिपमध्ये होते.
पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, दोघेही एक दिवसापूर्वीच आपापल्या घरातून बेपत्ता झाले होते. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. नोएडामध्ये एका कारच्या आत या दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी तरुणाच्या हातात पिस्तूल सापडलं असून, त्याने आधी तरुणीवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

तपासादरम्यान असंही समोर आले आहे की, तरुणाने तरुणीला एक मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने लिहिलं होतं की, ते दोघे गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तरुणाचा असा दावा होता की, तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं, मात्र आता ती दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार होती. पोलीस आता या अँगलनेही प्रकरणाचा तपास करत आहेत.
सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांची तपासणी केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाच्या प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे. ही घटना संपूर्ण नोएडामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.