निक्की भाटी हत्या प्रकरणात पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. निक्कीचा पती विपिन भाटी हा बेरोजगार होता आणि काहीही कमवत नव्हता. यामुळेच निक्कीच्या वडिलांनी तिच्यासाठी ब्युटी पार्लर उघडून दिले होते, जेणेकरून घरात कुणीतरी कमाई करणारा व्यक्ती असेल. निक्कीच्या वडिलांनी हा खुलासा केला आहे.
निक्कीच्या वडिलांनी सांगितले की, "विपिन काहीच काम करत नव्हता. म्हणून मी निक्कीसाठी ब्युटी पार्लर उघडून दिले. त्यातून निक्की महिन्याला एक लाख रुपये कमवत होती. पण ते सर्व पैसे विपिन आपल्याजवळ ठेवून घेत होता."
'दरमहा ५० हजार रुपये दे नाहीतर...'
निक्की वडिलांच्या मते, विपिन निक्कीला म्हणायचा की, "तू एक लाख रुपये कमवतेस, त्यातून ५० हजार रुपये मला दे." निक्कीने त्याला कधीच नकार दिला नाही, तरीही विपिन सगळे पैसे आपल्याजवळ ठेवायचा. तो दारू पिऊन निक्कीला मारहाण करत असे आणि नंतर त्याने तिचे ब्युटी पार्लरही बंद पाडले. त्यानंतर निक्की घरूनच पार्लरचे काम करत होती.
मोठ्या मुलीलाही मारहाण
त्यांनी पुढे सांगितले की, निक्कीसोबतच त्यांची मोठी मुलगी कंचन हिलाही मारहाण व्हायची. "जेव्हा कंचन तिच्या दीर रोहितचा विरोध करायची, तेव्हा रोहितही तिला मारहाण करायचा. आमच्या दोन्ही मुलींना त्या घरात सतत मारहाण केली जायची. ते लोक कायम पैशांची मागणी करत होते. आम्हीही आमच्या मुलींना त्रास होऊ नये म्हणून त्यांना पैसे देत राहिलो. आता आम्ही कंचनला आणि तिच्या दोन्ही मुलांना घरी आणले आहे. अशा नराधमांच्या घरी आम्ही आता कंचनला पाठवणार नाही," असे ते म्हणाले.
निक्कीची सासूही रोज नवीन मागणी करत असे आणि ती चप्पल, काठीने दोन्ही मुलींना मारहाण करत होती, असेही त्यांनी सांगितले.
'माझ्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं'
निक्कीची बहीण कंचनने आपल्या वेदना व्यक्त केल्या, "गेले आठ दिवस ते लोक आम्हाला खूप त्रास देत होते. २१ ऑगस्ट रोजी जेव्हा विपिन आणि सासू निक्कीला मारहाण करत होते, तेव्हा मी त्याचा व्हिडीओही काढला. त्यानंतर त्याने माझ्या बहिणीला मारून टाकले."
निक्कीचा लहान मुलगा आहे आणि तो आईशिवाय राहू शकत नाही. त्याने आपल्या डोळ्यासमोर हे सर्व घडताना पाहिले. निक्कीच्या मुलाने सांगितले की, "बाबांनी आईला मारले. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर काहीतरी टाकले आणि लायटरने तिला पेटवून दिले."