नाशिक अत्याचार: कंपनीची महिला मॅनेजर ताब्यात; लैंगिक अत्याचारासह धर्मांतरासाठी पसरवले जाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:40 IST2026-04-10T12:39:57+5:302026-04-10T12:40:48+5:30
‘ऑपरेशन मॅनेजर‘ पदावर कार्यरत महिलेला ताब्यात घेतले

नाशिक अत्याचार: कंपनीची महिला मॅनेजर ताब्यात; लैंगिक अत्याचारासह धर्मांतरासाठी पसरवले जाळे
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मुंबई नाका परिसरातील मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या लैंगिक अत्याचार तसेच धर्मांतरप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून संबंधित कंपनीत ‘ऑपरेशन मॅनेजर‘ पदावर कार्यरत महिलेला ताब्यात घेतले आहे. ती देखील या साखळीतील संशयित आरोपी असून तिच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत जलदपणे उघडकीस आणले असून याची गंभीर दखल घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
या घटनेत अटकेत असलेले पाचही संशयित आरोपी कशा पद्धतीने कंपनीतील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होते याची माहिती या महिला अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशीत दिल्याचे समजते.
एकाच्या धर्मांतराचा प्रयत्न
कंपनीतील एका २५ वर्षीय तरुणाचे अटकेतील संशयित आरोपींनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याच तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिल्याने प्रकरणाचा भंडाफोड झाला.
‘इंटरव्ह्यू फॉर्म’ची माहिती वापरून महिलांवर अत्याचार अटकेतील पाच संशयित आरोपींची कसून चाैकशी एसआयटी पथकाने पुन्हा एकदा केली. यामध्ये आरोपींनी आपला हेतू साध्य करण्यासाठी नोकरी लागण्याअगोदर जे इंटरव्ह्यू फॉर्म पीडितांनी भरले होते, त्यातील माहितीचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.