My husband cannot commit suicide; Death should be thoroughly investigated | Mukesh Ambani bomb scare : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

Mukesh Ambani bomb scare : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

ठळक मुद्देमाझ्या पतीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, कारण ते आत्महत्या करूच शकत नाही अशी मागणी विमल यांनी केली.  

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज आढळून आला. याप्रकरणी मनसुख यांची पत्नी विमल यांनी मी आणि माझा परिवार असा याबाबत विचार करू शकत नाही. आठ दिवसांपूर्वी गाडी हरवली होती. पोलिसांना माझे पती पूर्ण सहकार्य करत होते असे सांगितले. मात्र माझ्या पतीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, कारण ते आत्महत्या करूच शकत नाही अशी मागणी विमल यांनी केली.  

पुढे विमल यांनी सांगितले की, काल सुद्धा पोलिसांनी हिरण यांना बोलावले. कांदिवली क्राईम ब्रँचचे तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला. त्या पोलिसाने घोडबंदर येथे भेटायला बोलावले. मनसुख तिकडे गेले त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर मनसुख फोन बंद झाला. मात्र आज बातमी कळली की, त्यांचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला. पोलिसांकड़ून जेव्हा जेव्हा त्यांना बोलावले तेव्हा त्यांच्याकड़ून सहकार्य करण्यात येत होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. आयुष्यात असाही दिवस येईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ते तणावातही नव्हते. मनसुख आत्महत्या करू शकत नाही. तसेच पोलिसांवर संशय आहे का ? असे विचारले असता मला काहीही माहिती नाही असं विमल म्हणाल्या.  मुंब्रा खाडी येथे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असलेले मनसुख हिरण (५०) हे ठाण्यातील याच विकास पाम इमारतीच्या ए विंगमधील चौदाव्या मजल्यावर वास्तव्यास होते. 

Mansukh Hiren: “मनसुख हिरण आत्महत्या करणार नाहीत, ते चांगले स्विमर”; मुलाचा धक्कादायक दावा

 

"माझी मानसिक स्थिती ठीक नाही"; स्कोर्पिओ मालक मनसुखचं मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र

 

तो तावड़े कोण?

अशात आता तो तावड़े अधिकारी कोण ? तो शेवटचा कॉल नेमका कुठल्या अधिकाऱ्याचा होता? त्या भेटीत नेमके क़ाय घडले? ही आत्महत्या की हत्या? असे सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी आज आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तसेच आजच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी १०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र, मनसुख यांचा संशयास्पद मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.  

Web Title: My husband cannot commit suicide; Death should be thoroughly investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.