पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:46 IST2025-11-25T12:46:07+5:302025-11-25T12:46:58+5:30
पतीची हत्या करून त्याला निळ्या ड्रममध्ये टाकणारी आरोपी पत्नी मुस्कान हिने तुरुंगात एका मुलीला जन्म दिला आहे.

पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
पतीची हत्या करून त्याला निळ्या ड्रममध्ये टाकणारी आरोपी पत्नी मुस्कान हिने तुरुंगात एका मुलीला जन्म दिला आहे. २४ नोव्हेंबरच्या सायंकाळी सात वाजता मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये तिने बाळाला जन्म दिला. या मुलीचे नाव मुस्कानने 'राधा' ठेवले आहे. मात्र, या प्रकरणातील खरा सस्पेन्स अजूनही कायम आहे, तो नवजात मुलीचा पिता कोण? सह-आरोपी साहिल याने जेल प्रशासनाला याबाबत थेट विचारणा केल्यानंतर या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
तुरुंगातून साहिलची थेट विचारणा
मेरठ जेलचे सुपरिटेंडेंट वीरेश राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानच्या डिलिव्हरीची बातमी मिळताच सह-आरोपी साहिलने सकाळी जेल प्रशासनाकडे चौकशी केली. त्याने थेट विचारले की, मुस्कानला मुलगा झाला की मुलगी?
साहिलच्या या प्रश्नामुळे अनेकजण तर्क-वितर्क लावत आहेत की, या नवजात बाळाचा पिता साहिल तर नाही ना? यावर जेल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, याची माहिती केवळ डीएनए चाचणीनंतरच उघड होईल. घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मुस्कानच्या मृत पती सौरवच्या कुटुंबियांनीही बाळाच्या पित्याची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे.
आईसोबत ६ वर्षांपर्यंत तुरुंगात राहणार राधा
जेल मॅन्युअलनुसार, जर महिला कैदीला आपले बाळ सोबत ठेवायचे असेल, तर तिला सहा वर्षांपर्यंत ते बाळ जेलमध्ये ठेवण्याची परवानगी असते. याच नियमांनुसार, मुस्कानची मुलगी 'राधा' आता पुढील सहा वर्षे आईच्या देखरेखीखाली जेल परिसरातच राहणार आहे. मुस्कानने गरोदरपणातच इच्छा व्यक्त केली होती की, मुलगा झाल्यास त्याचे नाव 'कृष्ण' आणि मुलगी झाल्यास 'राधा' ठेवेल. त्यानुसार तिने मुलीचे नाव 'राधा' ठेवले आहे.
गर्भारपणात मिळाली विशेष काळजी
जेल प्रशासनाने सांगितले की, संपूर्ण गर्भारपणाच्या काळात मुस्कानला विशेष काळजी देण्यात आली. वेळोवेळी मेडिकल कॉलेजमध्ये तिची तपासणी करण्यात आली आणि स्त्रीरोगतज्ञांनी सांगितलेले आहार आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली. तिची तब्येत लक्षात घेऊन तिला जेलमध्ये कोणतेही कामही देण्यात आले नव्हते. प्रसूती वेदना वाढल्याने काही दिवसांपूर्वीच तिला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.
काय आहे निळा ड्रम हत्याकांड?
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी मिळून मुस्कानचा पती सौरव याची हत्या केल्याचे उघड झाल्यावर हे प्रकरण देशभर चर्चेत आले होते. सौरवच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि एका मोठ्या निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट टाकून मृतदेह लपवण्यात आला होता.
हत्या केल्यानंतर दोघांनी हिमाचल प्रदेशात जाऊन ट्रीप एन्जॉय केली होती. या दरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुमारे १५ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले. तुरुंगात वैद्यकीय तपासणीदरम्यान मुस्कान गरोदर असल्याचे समोर आले होते, तेव्हापासूनच 'बाळाचा पिता कोण?' हा प्रश्न सर्वात मोठा बनला आहे.