झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 22:07 IST2025-09-25T22:05:49+5:302025-09-25T22:07:41+5:30
गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात पोलिसांनी संगीतकार शेखर ज्योती गोस्वामीला अटक केली.

झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
Zubeen Garg Death: प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. झुबीन गर्ग यांनी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांचा मृत्यू कसा झाला हे अजूनही एक गूढच आहे. गर्ग यांच्या संशयास्पद मृत्यूने असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्यांची उत्तरे अद्याप सापडलेली नाहीत. झुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर गुवाहाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आसाम सरकार सिंगापूर सरकारशी सतत संपर्कात असून तिथून सर्व माहिती गोळा करत आहे. दरम्यान, सरकारने आता या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.
प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना अटक केली आहे. गोस्वामी हे या घटनेशी संबंधित वादग्रस्त नौका प्रवासादरम्यान उपस्थित होते. गोस्वामी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप गोस्वामींच्या अटकेचे कारण जाहीर केलेले नाही. तसेच त्यांच्याविरुद्ध औपचारिक आरोप दाखल केले जातील की नाही हे देखील स्पष्ट केलेले नाही. गर्ग यांच्या मृत्यूचा तपास सुरू असून हे प्रकरण नवीन वळणे घेत आहे.
झुबेन गर्ग यांच्या आकस्मित मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनांची साखळी पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न तपासकर्ते करत असताना, अनेक पुराव्यांसह तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती समोर आली आहे. झुबीन यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने विशेष डीजीपी एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यांची एसआयटी स्थापन केली आहे.
दरम्यान, उद्योजक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते श्यामकानू महंत हे देखील एसआयटीच्या निगराणीखाली आहेत. ते सध्या विमानतळाच्या लाउंजमध्ये आहेत आणि त्यांनी सीआयडीशी संपर्क साधून आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांची अटक लवकरच होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय, या प्रकरणाशी संबंधित सिंगापूर आसाम असोसिएशनच्या अनेक सदस्यांनाही ताब्यात घेतले जाऊ शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले तपासाचा विस्तार होत असताना आणखी काही व्यक्तींना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.याआधी एसआयटी अधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून महंतांच्या निवासस्थानी छापा टाकला होता.