Radhika Yadav : म्युझिक व्हिडीओमुळे संतापले वडील, टेनिस अकॅडमीलाही विरोध; राधिका हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:21 IST2025-07-11T15:19:53+5:302025-07-11T15:21:17+5:30
Radhika Yadav : टेनिसपटू राधिका यादव हिची वडील दीपक यादव यांनी गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.

Radhika Yadav : म्युझिक व्हिडीओमुळे संतापले वडील, टेनिस अकॅडमीलाही विरोध; राधिका हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मध्ये २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव हिची वडील दीपक यादव यांनी गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहेत. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, राधिकाचा एक म्युझिक व्हिडीओ ज्यावरून तिचे वडील खूप रागावले होते, ते यामागचं एक प्रमुख कारण असू शकतो.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवने सेक्टर ५७ मध्ये स्वतःची टेनिस अकॅडमी चालवण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं होतं. परंतु तिचे वडील दीपक यादव, जे माजी बँक कर्मचारी होते, ते याच्या विरोधात होते. मुलीच्या कमाईवरून लोक त्यांची खिल्ली उडवत असल्याने ते नाराज होते.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दीपकने राधिकाला अनेक वेळा अकॅडमी बंद करण्यास सांगितलं, परंतु राधिकाने त्यांचं ऐकण्यास नकार दिला. हे मतभेद देखील वडील आणि मुलीमधील भांडणांचं एक प्रमुख कारण बनलं.
इन्फ्लुएन्सर बनण्याचं होतं स्वप्न
एनडीटीव्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, राधिकाच्या हत्येचा आणखी एक पैलू समोर आला आहे, जो तिने बनवलेल्या एका म्युझिक व्हिडिओशी संबंधित आहे. दीपक यांना हा व्हिडीओ आवडला नाही आणि त्यांनी राधिकाला सोशल मीडियावरून तो काढून टाकण्यास सांगितलं होतं. परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचं होतं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने ते मान्य केलं नाही. यामुळे दीपक आणखी संतापले.
राधिकावर झाडल्या ५ गोळ्या
गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सेक्टर ५७ मधील सुशांत लोक-२ मधील पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना तिचे वडील दीपक यांनी तिच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन राधिकाच्या पाठीला लागल्या. राधिका जागीच कोसळली. तिचे काका कुलदीप यादव आणि आणखी एक नातेवाईक पीयूष यांनी तिला रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
वडिलांनी कबूल केला गुन्हा
पोलिसांनी दीपक यादव यांना घटनास्थळावरून अटक केली आणि रिव्हॉल्व्हर जप्त केले. पोलीस चौकशीत दीपक यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितलं की, गावकऱ्यांनी टोमणे मारले, मुलीच्या कमाईवर जगत असल्याचं म्हणत होते आणि राधिकाचा अकॅडमी चालवण्याचा आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याचा निर्णय अपमानास्पद होता.