भयंकर! जिच्या हत्येसाठी पती महिनाभर तुरुंगात सडला, ती पत्नी जिवंत सापडली; मावस भावावर होतं प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:13 IST2026-03-25T14:02:52+5:302026-03-25T14:13:03+5:30
पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पतीला सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

भयंकर! जिच्या हत्येसाठी पती महिनाभर तुरुंगात सडला, ती पत्नी जिवंत सापडली; मावस भावावर होतं प्रेम
UP Crime: कधीकधी याच कायद्याचा गैरवापर करून निर्दोष व्यक्तीला कसे अडकवले जाते, याचे जिवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये समोर आले आहे. ज्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह गायब केल्याच्या आरोपाखाली पती महिनाभर तुरुंगात होता, तीच पत्नी प्रत्यक्षात जिवंत असून आपल्या मावस भावासोबत हरियाणात सुखाने संसार करत असल्याचे उघड झाले.
नेमकं प्रकरण काय?
महेवाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलवारा गावात राहणाऱ्या राजू तिवारी याचा विवाह २०१६ मध्ये अंकितासोबत झाला होता. अंकिताला दोन मुलेही आहेत. मात्र, लग्नानंतर काही काळातच अंकिताचे तिच्या मावस भावाशी प्रेमसंबंध जुळले. २०२४ मध्ये ती पहिल्यांदा संकल्पसोबत पळून गेली होती, मात्र पंचायतीच्या निर्णयामुळे ती पुन्हा सासरी आली.
दुसऱ्यांदा पळाली आणि हत्येचा बनाव
२१ जानेवारी २०२६ रोजी अंकिता घरातील दागिने आणि रोकड घेऊन पुन्हा बेपत्ता झाली. राजूने तिच्या हरवल्याची तक्रार नोंदवली. मात्र, अंकिताच्या माहेरच्यांनी डाव साधला. त्यांनी २० फेब्रुवारी रोजी सासरच्यांविरुद्ध अंकिताची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या दबावामुळे राजू तिवारी याने २७ फेब्रुवारीला न्यायालयात शरणागती पत्करली आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
पोलिसांचा तपास आणि हरियाणात सापडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता यापूर्वीही एका तरुणासोबत पळून गेली होती, त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाचे लोकेशन ट्रेस केले. तेव्हा त्याचे लोकेशन हरियाणातील मानेसरमध्ये मिळाले. पोलिसांनी सलग चार दिवस त्या घरावर नजर ठेवली आणि सोमवारी अचानक छापा टाकला. तेव्हा अंकिता तिथे आपल्या प्रियकरासोबत भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले. तिने पोलिसांना स्पष्ट सांगितले की, मी माझ्या मर्जीने येथे आली आहे.
सासरच्यांचे हाल; माहेरच्यांवर गुन्हा
राजू तिवारी तुरुंगात असताना त्याचे वृद्ध वडील आणि कुटुंब अटक टाळण्यासाठी घराला कुलूप लावून इकडे-तिकडे भटकत होते. अंकिताच्या वडिलांनी आणि भावाने सत्य माहिती लपवून खोटा गुन्हा दाखल केल्याचे सिद्ध झाले आहे.पोलिसांनी अंकिताचे वडील शारदा प्रसाद आणि भाऊ गोपाल मिश्रा यांना अटक केली आहे. अंकिता जिवंत सापडल्यानंतर न्यायालयाने निर्दोष पती राजू तिवारी याची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.