पत्नीला फोन केल्याच्या रागातून तरुणाचा खुन, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 15:20 IST2019-01-01T15:14:49+5:302019-01-01T15:20:32+5:30
पत्नीला फोन करण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला.

पत्नीला फोन केल्याच्या रागातून तरुणाचा खुन, आरोपीला अटक
पुणे : पत्नीला फोन करण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना कॅम्प एज्युकेशनच्या मागील बाजूला असलेल्या कॅनॉलच्या कडेला सोमवारी सायंकाळी घडली.
किसन सुरेश नुय्या (वय २७, रा़ सर्व्हेट क्वार्टर, स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव असून महंमद असे खुन झालेल्याचे नाव आहे. पत्नीला फोन करण्याच्या रागातून हा खुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन नुय्या हा सफाईचे काम करतो. काल रात्री नाल्याजवळ एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती लष्कर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर एका ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाच्या अंगावर धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याचे दिसून येत होते. मात्र, या तरुणाची ओळख पटली नव्हती. या भागात पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यावेळी तेथे किसन हा त्या ठिकाणी घुटमळत असल्याचे लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपणच त्याला मारल्याची कबुली दिली. महंमद हा त्याच्या पत्नीला फोन करत असल्याने रागातून आपण त्याचा खुन केल्याचे किसन सांगत आहे. महंमद याची अजून माहिती उपलब्ध झाली नसून लष्कर पोलीस अधिक तपास करत आहेत.