पुण्यात गोळीबार करून तरुणाचा खून, कोयत्यानेही केले निर्घुण वार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 10:41 IST2020-07-13T10:41:35+5:302020-07-13T10:41:40+5:30

पूर्ववैमनस्यावरुन तिघा जणांनी तरुणावर गोळीबार करून त्यानंतर कोयत्याने वार करुन एका तरुणाचा निर्घुण खुन केल्याची घटना शाहू वसाहतीत घडली.

Murder of a young man by firing in Pune | पुण्यात गोळीबार करून तरुणाचा खून, कोयत्यानेही केले निर्घुण वार   

पुण्यात गोळीबार करून तरुणाचा खून, कोयत्यानेही केले निर्घुण वार   

पुणे - पूर्ववैमनस्यावरुन तिघा जणांनी तरुणावर गोळीबार करून त्यानंतर कोयत्याने वार करुन एका तरुणाचा निर्घुण खुन केल्याची घटना शाहू वसाहतीत घडली. अमित मिलिंद सरोदे (वय २१, रा. गल्ली नंबर २५, जनता वसाहत, पर्वती) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ महेश मोहोळ (वय २१, रा. शाहु वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  या फिर्यादीवरुन पोलिसांनी आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांपैकी ननावरे आणि बोंबल्या हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मोहोळ आणि अमित सरोदे हे दोघे मित्र होते. सौरभ मोहोळ आणि अमित सरोदे हे शाहु वसाहतीतील बालाजी होलसेल येथे रविवारी रात्री पावणे अकरा वाजता उभे होते. शहरात रात्री १० नंतर संचारबंदी असली तरी लोक ती पाळताना दिसत नाही. दोघेही रात्री उशिरा तेथे थांबलेले असताना आदर्श ननावरे, बोंबल्या व यशवंत कांबळे तेथे आले. ननावरे याने आपल्याकडील पिस्तुल काढून अमित सरोदे याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर यशवंत कांबळे याच्या सांगण्यावरुन बोंबल्या व ननावरे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने अमितच्या मानेवर, डोक्यावर सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. त्यानंतर तिघे पळून गेले. याची माहिती मिळाल्यावर दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमितला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता़ दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a young man by firing in Pune