धक्कादायक! महाड येथे महिलेकडून पोटच्या सहा मुलांची हत्या; विहिरीत ढकलून दिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 00:28 IST2022-05-31T00:24:03+5:302022-05-31T00:28:07+5:30
महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले.

धक्कादायक! महाड येथे महिलेकडून पोटच्या सहा मुलांची हत्या; विहिरीत ढकलून दिलं
महाड तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. महिलेला मात्र वाचवण्यात यश आले आहे.
महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले.
पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले आणि त्यांनतर तिनेदेखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासी भागातील लोकांनी तीला पाहिले आणि विहिरीतून बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तीने हकीकत सांगितल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
महिलेचा जीव वाचला असला तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.
महाड तालुक्यातील खरवली बोरगाव हद्दीमधील ही घटना असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चार मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले घटनास्थळी पोहोचले असून पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र महिलेचे नाव अथवा तिचे नवऱ्याशी कशावरून भांडण झाले यासंदर्भात कोणताही खुलासा पोलीस विभागाकडून अधिकृतपणे प्राप्त होऊ शकलेला नाही.