मालकाकडे चुगली केल्याच्या कारणावरून सहकारी कामगाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 18:39 IST2021-10-16T18:38:01+5:302021-10-16T18:39:22+5:30
Crime News : वाड्यातील वडवली येथील घटना : आरोपी अटकेत

मालकाकडे चुगली केल्याच्या कारणावरून सहकारी कामगाराची हत्या
वाडा : तालुक्यातील वडवली येथील एका कंपनीत कामगाराने सहकारी कामगाराची चुगली मालकाकडे केली होती. याचा राग मनात धरून झोपेत असलेल्या रामलाल पाल या कामगाराच्या डोक्यात जड लोखंडी साहित्याने जोराचा प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ माजली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वडवली या गावाच्या हद्दीत 'अॅच्युअल इंडस्ट्रीज' असून यामध्ये आठव्या गाळ्यात कॅन्टमेटल ही कंपनी आहे. या कंपनीत भांड्यांना कलई करण्याचे काम केले जाते. या कंपनीत आरोपी घनश्याम पाल (वय ४५) गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत होता. त्याने गावावरून मयत रामलाल पाल या सहकारी कामगाराला कामासाठी आणले होते. रामलाल पाल हा मालकाकडे घनश्याम याची वारंवार चुगली करायचा. त्यामुळे मालकाने घनश्याम याला काढून टाकले होते.
याचा राग घनश्याम याने मनात धरून शुक्रवारी (दि.१५) रात्री एक वाजण्याच्या सुमारास रामपाल झोपेत असताना घनश्याम याने त्याच्या डोक्यात लोखंडी जड वजनाची वस्तू घातल्याने रक्तबंबाळ झालेल्या रामपालचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी घनश्याम पाल याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये करीत आहेत.