Mumbhai Bandh : 447 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 21:56 IST2018-07-25T21:52:05+5:302018-07-25T21:56:36+5:30
Mumbhai Bandh : मुंबईमध्ये आज 45 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद

Mumbhai Bandh : 447 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाने आज पुकारेल्या आंदोलनाला मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. तोडफोड किंवा जाळपोळासह अनुचित प्रकार करणाऱ्या 447 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी लोकमतला दिली आहे. मुंबईमध्ये आज 45 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद उमटले असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.
आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणा-या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात होता. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात होते.
सगळीकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच ठाण्यात आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक केली होती. परंतु गाड्या फोडणारे हे आंदोलक नसून समाजकंटक असल्याची महत्त्वपूर्ण माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, पोलीस पूर्ण संरक्षण देत आहेत, असंही परमवीर सिंग म्हणाले आहेत.