मुंबईच्या प्रेयसीचा गोरखपूरमध्ये भयानक शेवट; पत्नीच्या मदतीने पतीनेच केला खून; ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं, पण…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:22 IST2026-02-03T13:54:40+5:302026-02-03T14:22:13+5:30

उत्तर प्रदेशात मुंबईतील एका महिलेची तिच्या पतीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे.

Mumbai Woman Murdered in Gorakhpur Husband Second Wife and Father in law Arrested for Chilling Crime | मुंबईच्या प्रेयसीचा गोरखपूरमध्ये भयानक शेवट; पत्नीच्या मदतीने पतीनेच केला खून; ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं, पण…

मुंबईच्या प्रेयसीचा गोरखपूरमध्ये भयानक शेवट; पत्नीच्या मदतीने पतीनेच केला खून; ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं, पण…

UP Crime: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर हत्येचा अत्यंत भीषण प्रकार गोरखपूरमध्ये समोर आला आहे. मुंबईत राहणाऱ्या ३५ वर्षीय प्रिया शेट्टी या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पुलाखाली फेकून देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, हा खून तिच्या प्रियकराने आपल्या पत्नीच्या मदतीने केला आहे. पकडले जाऊ नये म्हणून आरोपीने चक्क आपले डोक्याचे केस आणि दाढी-मिशा काढून स्वतःचे रूप बदलले. मात्र पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.

३० जानेवारी रोजी गोरखपूरच्या पीपीगंज भागातील बरघट्टा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने तिच्या चेहऱ्यावर विटांनी वार करून तो ओखळता येणार नाही असा केला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता, सीसीटीव्हीमध्ये एका स्कूटीवर एक पुरुष आणि दोन महिला जाताना दिसल्या. त्यावरून पोलीस मुख्य आरोपी विजय कुमार साहनीपर्यंत पोहोचले.

विम्याच्या कामातून ओळख, मग लिव्ह-इन आणि लग्न

विजय साहनी हा एका विमा कंपनीत काम करत होता. २०१२ मध्ये मुंबईत काम करत असताना त्याची ओळख प्रिया शेट्टीशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांनी मंदिरात लग्नही केले आणि त्यांना आता १३ वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र, २०१४ मध्ये विजयने आपल्या गावी येऊन संध्या नावाच्या दुसऱ्या महिलेशी लग्न केले.

प्रेयसीचा तगादा आणि खुनाचा कट

विजयने दोन लग्ने केली होती, ही बाब काही काळाने त्याच्या दोन्ही पत्नींना समजली. प्रिया सातत्याने विजयकडे त्याच्या घरी राहण्यासाठी तगादा लावत होती, अन्यथा गावी येऊन गोंधळ घालण्याची धमकी देत होती. ही बाब विजयने आपली पत्नी संध्या आणि सासरा रामबिलास यांना सांगितली. सर्वांनी मिळून प्रियाला संपवण्याचा कट रचला.

दारूची पार्टी आणि निर्घृण हत्या

२६ जानेवारीला विजय प्रियाला घेऊन गोरखपूरला आला. दोन दिवस त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि मद्यप्राशन केले. २९ जानेवारीच्या रात्री विजय, त्याची पत्नी संध्या आणि प्रिया एका रिक्षाने पीपीगंजला गेले. तिथे रिक्षावाल्याशी पैशांवरून वाद झाल्यानंतर ते उतरले. विजयने सासऱ्याची स्कूटी मागवली आणि ते सहजनवाच्या दिशेने निघाले.

वाटेत पुन्हा दारू प्यायल्यानंतर प्रियाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा पत्नी संध्या म्हणाली, हिचा कायमचा काटा काढून टाका. विजयने दारूच्या नशेत असलेल्या प्रियाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुलाखाली मृतदेह नेऊन ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा विटांनी ठेचला आणि तिचे कपडे काढून तिला पूर्णपणे विवस्त्र केले.

'तो' रिक्षावाला ठरला साक्षीदार

दुसऱ्या दिवशी विजयने तातडीने नाव्याकडे जाऊन आपले डोक्याचे केस आणि दाढी-मिशा काढून टाकल्या, जेणेकरून सीसीटीव्हीमध्ये तो ओळखला जाणार नाही. पत्नीने स्वतःचे कपडे नदीत फेकून दिले. मात्र, ज्या रिक्षावाल्याशी त्यांचा वाद झाला होता, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे तपासाला वेग आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने विजयला बेड्या ठोकल्या.

तिघांनाही कोठडी

पोलिसांनी या प्रकरणात विजय साहनी, त्याची पत्नी संध्या साहनी आणि ज्याची स्कूटी वापरली तो सासरा रामबिलास साहनी या तिघांनाही अटक करून जेलमध्ये पाठवले आहे. प्रियाचा १३ वर्षांचा मुलगा सध्या मुंबईत आहे.

Web Title : मुंबई की महिला की गोरखपुर में प्रेमी, पत्नी द्वारा हत्या; रूप बदला।

Web Summary : गोरखपुर में एक मुंबई की महिला की उसके प्रेमी और उसकी पत्नी ने हत्या कर दी क्योंकि उसने उसके साथ रहने की मांग की थी। आदमी ने पकड़ से बचने के लिए अपना रूप बदल लिया, लेकिन पुलिस ने सीसीटीवी और एक रिक्शा चालक की गवाही का उपयोग करके उसे, उसकी पत्नी और ससुर को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Mumbai woman murdered by lover, wife in Gorakhpur; appearance altered.

Web Summary : A Mumbai woman was murdered in Gorakhpur by her lover and his wife after she demanded he live with her. The man altered his appearance to evade capture, but police used CCTV and a rickshaw driver's testimony to arrest him, his wife, and father-in-law.