जेव्हा आईच पोटच्या गोळ्याचा जीव घेते...

By मनीषा म्हात्रे | Updated: May 22, 2025 12:59 IST2025-05-22T12:56:11+5:302025-05-22T12:59:10+5:30

अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले.

Mumbai When the mother kills baby girl | जेव्हा आईच पोटच्या गोळ्याचा जीव घेते...

जेव्हा आईच पोटच्या गोळ्याचा जीव घेते...

मुंबई : अवघ्या अडीच वर्षांची चिमुकली. वडिलांची साथ सुटल्यानंतर आईला सर्वस्व मानणारी. मात्र, आईच्या ममतेला काळिमा फासणाऱ्या या आईने प्रियकराची वासना भागविण्यासाठी पोटच्या गोळ्याला पुढे केले. प्रियकराकडून चिमुकलीवर बलात्कार होत असताना तडफडणाऱ्या चिमुकलीचे पाय आईनेच पकडले. एवढेच नाही, तर तिची किंकाळी शेजाऱ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून तिच्या तोंडावर उशी दाबणारा हातही आईचाच. याच, अत्याचारात चिमुकलीने प्राण सोडले. मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वांनाच हादरवले. पुन्हा एकदा चिमुकले स्वतःच्या घरातही असुरक्षित असल्याचे समोर आले.

अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले. लैंगिक अत्याचार इतका गंभीर होता की चिमुकलीच्या यकृतासह अन्य अवयवांना गंभीर जखमा झाल्या. मुलीचा मृतदेह आणि जखमा पाहून पोलिस अधिकारीही हेलावले. पोलिसांनी चिमुकलीची ३० वर्षीय आई आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकराला अटक केली. प्राथमिक चौकशीदरम्यान प्रियकराची वासना भागविण्यासाठी आईने आपल्या मुलीला पुढे केले, अशी धक्कादायक माहिती पुढे आली.

आरोपी आईला पतीने सोडल्यानंतर ती मुलीसह माहेरी राहत होती. मुलीची आजी धुणीभांडी करते. आरोपी आईचे त्याच परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. रविवारी हे दोघे मुलीसोबत घरी असताना ही घटना घडली. या क्रूर अत्याचारात मुलगी बेशुद्ध पडली. तिचा मृत्यूही झाला. भानावर येताच दोघांनी तिला सरकारी रुग्णालयात नेले. भोवळ येऊन मुलगी पडली, असा बहाणा त्यांनी केला. मात्र, सतर्क सरकारी डॉक्टरांनी मुलीच्या नाजूक भागावरील आणि शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना बोलावून घेतले आणि अत्याचाराला वाचा फुटली.

पोलिस दीदीचा आधार 
अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिस दीदीकडून शाळा, महाविद्यालयांसह चाळी, सोसायट्यामध्ये चांगल्या-वाईट स्पर्शाचे धडे देण्यात येत आहेत. यातून अनेक गुन्ह्यांना वाचा फुटण्यास मदत झाली. काही घटनांमध्ये वेळीच सतर्क झाल्याने घटनाही टळल्याचे दिसून आले.

याआधीच्या घटना
शिक्षकाकडून अत्याचार 
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थ्याला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

वडीलच निघाले विकृत 
दारूच्या नशेत वडिलांनीच १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवलीत समोर आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

Web Title: Mumbai When the mother kills baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.