केरळमधून एका महिलेला नुकतीच POCSO कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. ही ३० वर्षीय महिला एका अल्पवयीन मुलासह केरळहून कर्नाटकात पळून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचाही कर्नाटकातच स्थायिक होण्याचा इरादा होता. तथापि, पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले. यानंतर आता संबंधित अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहे. तर, चेरथला पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलासोबत पळून जाऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल ३० वर्षीय महिलेला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. ही महिला साधारणपणे एक आठवड्यापूर्वी तिच्या दूरच्या नातेवाईक अल्पवयीन मुलासोबत फरार झाली होती.
यानंतर, दोन्ही कुटुंबांनी स्वतंत्र एफआयआर दाखल केले होते. ५ दिवसांच्या शोधानंतर, दोघेही कर्नाटकातील कोल्लूरमध्ये सापडले. पोलिसांनी पुढे सांगितले की, त्यांना कोल्लूरमधून ताब्यात घेण्यात आले. येथे महिलेने स्थायिक होण्याच्या हेतूने घरही भाड्याने घेतले होते. महत्वाचे म्हणजे, या काळात, पकडले जाण्याच्या भीतीने तिने फोनही वापरला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची एका कौटुंबिक कार्यक्रमात त्या मुलाशी भेट झाली होती. येथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, जेव्हा तिच्या पतीने तिला आपल्या घरी (तिच्या सासरच्या घरी) परत आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने नकार दिला. यानंतर, ती गावातूनच संबंधित अल्पवयीन मुलाला घेऊन पळून गेली होती.