बाळाला प्रवाशांच्या हातात देऊन महिलेने काढला पळ; जाताना ट्रेनमधून फक्त पाहत राहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:20 IST2025-07-02T13:15:03+5:302025-07-02T13:20:16+5:30
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईच्या सीवूड स्थानकावर बाळाला सोडून पळ काढणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे

बाळाला प्रवाशांच्या हातात देऊन महिलेने काढला पळ; जाताना ट्रेनमधून फक्त पाहत राहिली
Seawoods Station Crime:नवी मुंबईत गेल्या आठवड्यात आश्रमाबाहेर दोन दिवसांच्या बाळाला सोडल्याचे प्रकरण ताजे असतानात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अविवाहित असलेल्या जोडप्याने नवजात बाळाला आश्रमाच्या बाहेर सोडून दिलं होतं. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांनाही शोधून काढलं. दुसरीकडे नवी मुंबईत सीवुड दारावे स्थानकात एक महिलेने प्रवाशांकडे १५ दिवसांच्या बाळाला सोडून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, बाळाला सोडून पळ काढणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सोमवारी दुपारी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने तिच्या १५ दिवसांच्या बाळाला एका प्रवाशाकडे सोडून दिले. बाळ असल्याने सामान घेऊन उतरता येत नसल्याच्या बहाणा करत महिला पळून गेली. हार्बर लाईनवरील सीवूड्स रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू केला आहे.
दिव्या नायडू (१९) ही तरुणी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिची मैत्रिण भूमिका मानेसोबत सीएसएमटीहून जुईनगरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, ट्रेन सानपाडा स्टेशनवरून जात असताना, दोन्ही मैत्रिणी जुईनगरला उतरण्यासाठी दरवाजाकडे गेल्या. त्याच डब्यात ३० ते ३५ वयोगटातील एक अज्ञात महिला त्यांच्यासोबत उभी होती. तिच्या एका हातात तीन बॅगा होत्या आणि दुसऱ्या हातात बाळ होते.
महिलेने दिव्या आणि तिच्या मैत्रिणीला आपण सीवूड्स स्टेशनवर उतरणार आहे पण सामान आणि बाळामुळे एकटी उतरू शकत नाही असं सांगितले. महिलेने दोघींनी सीवूड्सपर्यंत बाळाला हातात घ्या असं सांगितले. मदत करण्याच्या भावनेने त्या दोघे बाळाला घेऊन सीवूड्स येथे उतरले. मात्र ती महिला ट्रेनमधून खाली उतरली नाही. ट्रेन सुरु झाल्यावर ती दोघींकडे पाहत होती. दोघींनाही नेमकं काय घडलं हे कळलचं नाही. त्यानंतर ती महिला बाळाला घ्यायला परत येईल या आशेने दोघीही तिथेच वाट पाहत उभ्या राहिल्या. मात्र जेव्हा ती महिला परत आली नाही तेव्हा त्यांनी ताबडतोब रेल्वे पोलिसांना कळवले.
रेल्वे पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती स्थिर असून ते १५ दिवसांचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर, बालकाला बाल कल्याण समितीमार्फत बाल आश्रयस्थानात ठेवण्यात येणार आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ अंतर्गत बाळाला सोडून पळणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि शोधण्यासाठी ट्रेन आणि स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.