राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:36 IST2025-11-27T13:33:36+5:302025-11-27T13:36:38+5:30
या क्रूर हल्ल्यात वधू रक्तबंबाळ झाली, तर नवऱ्याला वाटले की तिचा मृत्यू झाला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
प्रेम, आनंद आणि नव्या आयुष्याची सुरुवात असणारी मधुचंद्राची रात्र एका नवविवाहित वधूसाठी मृत्यूचा सापळा बनली. तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री वधूने शारीरिक संबंधांची मागणी मान्य केली नाही, यावरून नवरदेवाला इतका राग आला की त्याने दुसऱ्या खोलीतून हातोडा आणून आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात वधू रक्तबंबाळ झाली, तर नवऱ्याला वाटले की तिचा मृत्यू झाला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.
चेन्नईच्या पुरासैवक्कम भागात ही भयानक घटना घडली आहे. मॅट्रिमोनिअल साईटद्वारे जुळलेले हे लग्न अवघ्या एका रात्रीत दोन्ही कुटुंबांसाठी मोठा आघात ठरले. वधू-वराचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले, घरी वधूचे स्वागतही झाले. पण, सुहागरात्रीला वधूने आधी एकमेकांना वेळ देऊन ओळख वाढवण्याची विनंती केली, जी नवरदेवाला मान्य झाली नाही. या मागणीला नकार मिळताच त्याने रागाच्या भरात हातोडा उचलला आणि वधूवर अनेक वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
अरेंज मॅरेज, पण संबंधांसाठी हट्ट
पुरासैवक्कम येथील पार्थसारथी स्ट्रीटचा रहिवासी असलेल्या ऑगस्टीन जोशुआ याचा विवाह तिरुवल्लूर येथील २४ वर्षीय युवतीशी २३ नोव्हेंबर, २०२५ रोजी झाला. सर्व विधी पूर्ण झाल्यावर वधू-वर बेडरूममध्ये गेले. दोघांचे लग्न अरेंज्ड मॅरेज असल्यामुळे, वधूची इच्छा होती की त्यांनी आधी एक-दोन दिवस बोलून एकमेकांना समजून घ्यावे. तिने जोशुआला स्पष्टपणे सांगितले, “आधी आपण एकमेकांना चांगले ओळखूया”. मात्र, नवरदेव जोशुआ तातडीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हट्ट करू लागला. वधूने त्याला नकार दिला, तेव्हा जोशुआचा पारा चढला.
संताप अनावर, हातोड्याने हल्ला
वधूने मागणी मान्य न केल्यामुळे चिडलेला जोशुआ दुसऱ्या खोलीत गेला आणि तिथून एक हातोडा घेऊन परतला. त्याने कोणतीही दयामाया न दाखवता नववधूच्या शरीरावर हातोड्याने सपासप अनेक वार केले. हल्ल्यामुळे वधू पूर्णपणे रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. वधूचा मृत्यू झाला आहे, असे समजून आरोपी जोशुआ लगेचच घटनास्थळावरून पळून गेला.
सकाळ होताच उघडकीस आले काळे सत्य
सकाळी जेव्हा घरातील इतर सदस्यांनी खोलीत वधूला बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पहिले. त्यांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. शुद्धीवर आल्यावर वधूने तिची आपबिती सांगितली. तिने सांगितले की, जोशुआने हुंडा न घेता लग्न करायचे असल्याचे सांगितले होते, म्हणून तिने लग्नाला होकार दिला. पण सुहागरात्री त्याची मागणी नाकारताच जोशुआने क्रूर रूप धारण केले.
नवरदेवाचे अनेक स्त्रियांशी होते संबंध
वधूने पोलिसांना सांगितले की, जोशुआचे अनेक स्त्रियांसोबत संबंध होते, त्यापैकी एका महिलेला दोन मुले आहेत आणि ती विवाहित आहे. तिचा नवरा तिच्यापासून हे सत्य लपवत होता. या भयानक घटनेनंतर वधूने आता जोशुआसोबत कोणत्याही परिस्थितीत राहण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी ऑगस्टीन जोशुआचा कसून शोध सुरू आहे.