Garima Tiwari : "दारू पिऊन मारहाण, पैसे हिसकावले, उपाशी ठेवलं"; मॉडेलचे क्रिकेटपटू अमित मिश्रावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:17 IST2026-03-10T11:16:02+5:302026-03-10T11:17:05+5:30
Garima Tiwari : ३५ वर्षीय मॉडेल गरिमा तिवारीने पती, आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Garima Tiwari : "दारू पिऊन मारहाण, पैसे हिसकावले, उपाशी ठेवलं"; मॉडेलचे क्रिकेटपटू अमित मिश्रावर आरोप
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ३५ वर्षीय मॉडेल गरिमा तिवारीने न्यायालयात पती, आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गरिमाने पतीवर हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून न घेतल्याने पीडितेने न्यायालयामार्फत न्यायाची मागणी केली आहे.
इन्स्टाग्रामवर प्रेम आणि नंतर लग्न
गरिमा तिवारीने दिलेल्या माहितीनुसार, तिची आणि अमित मिश्राची ओळख २०१९ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २६ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी कानपूर क्लबमध्ये लग्न केलं. अमित मिश्रा सध्या रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर काही काळातच पती आणि सासरच्या लोकांनी 'होंडा सिटी' कार आणि १० लाख रुपयांची मागणी सुरू केल्याचा आरोप गरिमाने केला आहे.
फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
मॉडेलने असा आरोप केला आहे की, अमित दारू पिऊन तिला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करायचा. तिला कित्येक दिवस उपाशी ठेवलं जायचं आणि मॉडेलिंगमधून मिळणारी तिची कमाई देखील हिसकावून घेतली जायची. या छळामुळे गरिमा डिप्रेशनमध्ये गेली. तिला आपलं करिअर सोडावं लागले. मानसिक तणावामुळे तिने एकदा फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
आपण पोलीस आयुक्त कार्यालयासह अनेक ठिकाणी दाद मागितली, परंतु अमितच्या प्रभावामुळे एफआयआर नोंदवला गेला नाही, असा दावा गरिमाने केला आहे. तिचे वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी सांगितलं की, पोलिसांच्या निष्क्रियतेनंतर आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. याच दरम्यान, अमितवर नोंदवलेला हा तिसरा खटला आहे. यापूर्वी २०२५ मध्ये गरिमाने घरगुती हिंसाचार आणि ५०,००० रुपये मासिक भत्ता व १ कोटी रुपयांच्या भरपाईसाठी देखभाल याचिका दाखल केली होती.