आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 12:54 IST2025-05-18T12:49:02+5:302025-05-18T12:54:49+5:30
कर्जाची परतफेड टाळण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचे एक धक्कादायक प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे.

आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
कर्जाची परतफेड टाळण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचे एक धक्कादायक प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे. गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत काम करणारा व्यवस्थापक अचानक दिल्लीतून बेपत्ता झाला होता. आता तो उत्तर प्रदेशातील अयोध्येत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काक्रोला भागात एका नाल्याजवळ आयटी कंपनीत काम करणाऱ्या या मॅनेजरची गाडी बेवारस अवस्थेत आढळली होती. गाडीचे दरवाजे उघडे होते आणि आत कोणीही नव्हते.
आत्महत्येचं चित्र तयार केलं...
घटनास्थळी असे चित्र निर्माण करण्यात आले होते की, जणू काही गाडी मालकाने नाल्यात उडी मारून आत्महत्या केली आहे, असेच वाटत होते. पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथकाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शोध मोहीम सुरू करण्यात आली, पण कुठेही काहीही सापडले नाही. पोलिसांनी सखोल तपास सुरू केला, तेव्हा या व्यक्तीने बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी आपला मोबाईल फोन पूर्णपणे फॉरमॅट केल्याचे लक्षात आले.यावरूनच पोलिसांना संशय आला की, हे आत्महत्येचे प्रकरण नसून सुनियोजित कट असावा.
यानंतर, पोलिसांनी मोबाईल नेटवर्क ट्रेसिंगच्या मदतीने लोकेशन ट्रॅक केले. लोकेशन ट्रेस करताच ही व्यक्ती उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे असल्याचे आढळून आले. सदर माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने अयोध्येला पोहोचले आणि त्याला धर्मशाळेतून त्याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान जे उघड झाले ते आणखी धक्कादायक होते.
नेमकं कारण काय?
या बेपत्ता आयटी मॅनेजरवर लाखो रुपयांचे कर्ज होते. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि कायदेशीर अडचणींपासून स्वतःला वाचवण्यासाठी, त्याने त्याच्या 'बेपत्ता' होण्याची कहाणी रचली. गाडी नाल्याजवळ सोडून तो थेट अयोध्येत पळाला आणि तिथल्या धर्मशाळेत लपून राहू लागला. त्याच्या या कृत्यामुळे केवळ त्याच्या कुटुंबालाच धक्का बसला नाही, तर पोलीस प्रशासनालाही खूप त्रास सहन करावा लागला. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.