४ मिनिटांत ५२ वेळा सॉरी बोलूनही ऐकलं नाही; प्रिंसिपलच्या धाकाने विद्यार्थ्याची तिसऱ्या मजल्यावरून उडी; मोबाईल आणल्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:43 IST2025-12-05T16:43:28+5:302025-12-05T16:43:58+5:30

प्रिंसिपलच्या मानसिक त्रासाला कंटाळून राष्ट्रीय स्तरावरील स्केटर विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

Mental Torture 14 Year Old Student jump Being Allegedly Threatening with Expulsion by Principal Over Mobile Phone | ४ मिनिटांत ५२ वेळा सॉरी बोलूनही ऐकलं नाही; प्रिंसिपलच्या धाकाने विद्यार्थ्याची तिसऱ्या मजल्यावरून उडी; मोबाईल आणल्याची शिक्षा

४ मिनिटांत ५२ वेळा सॉरी बोलूनही ऐकलं नाही; प्रिंसिपलच्या धाकाने विद्यार्थ्याची तिसऱ्या मजल्यावरून उडी; मोबाईल आणल्याची शिक्षा

MP Crime: मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका खासगी शाळेत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या आणि राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंगपटू असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनेच्या काही मिनिटे आधी या विद्यार्थ्याने प्रिंसिपलच्या ऑफिसमध्ये भीतीने थरथरत अवघ्या चार मिनिटांत ५२ वेळा मागितल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले आहे. त्याने चुकीसाठी प्राध्यापकासमोर तब्बल ५२ वेळा सॉरी असं म्हटलं होतं.

पीडित विद्यार्थी हा एका डॉक्टरचा मुलगा आहे. आठवड्याभरापूर्वी इयत्ता १०वीच्या एका विद्यार्थ्याने वर्गातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो व्हायरल झाला होता. यानंतर काहीतरी गडबड झाली असावी, या भीतीने विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, प्रिंसिपलच्या ऑफिसमध्ये गेलेला हा विद्यार्थी प्रचंड घाबरलेला आणि गोंधळलेला होता. त्याने कान पकडून वारंवार माफी मागितली, पण प्रिंसिपल डॉ. डॉली चौहान यांनी त्याला फटकारले आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली.

या विद्यार्थ्याने २८ नोव्हेंबर रोजी शाळेत मोबाईल आणला होता. याच कारणामुळे प्रिंसिपलने त्याला शाळेतून निलंबित करण्याची धमकी देत पालकांना बोलावले होते. पालकांना बोलवायला सांगताच विद्यार्थी अधिकच घाबरला. तो ऑफिसमधून बाहेर धावला आला. कॉरिडॉरमधून सैरावैरा धावत तो थेट शाळेच्या छतावर गेला आणि तेथून त्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त दुखापत झाल्याने त्याला गीतादेवी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असून, त्याला पुढील उपचारासाठी रतलाममधून अहमदाबाद येथे हलवण्यात आले आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला हा विद्यार्थी एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. तो राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंगपटू असून त्याने विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ६ पदके जिंकली आहेत. ४ डिसेंबर २०२५ रोजी त्याला विशाखापट्टणम येथे होणाऱ्या आणखी एका राष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. विद्यार्थ्याला झालेल्या मानसिक त्रासामुळेच त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.

या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी आदिवासी छात्र संघटनेने शाळेला घेराव घालून जोरदार आंदोलन केले. त्यांनी प्रिंसिपल डॉ. डॉली चौहान आणि स्कूल मॅनेजर राजेंद्र पितलिया यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. जिल्हा शिक्षण अधिकारी अनीता सागर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय टीम नेमण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. हा विद्यार्थी शुद्धीवर आल्यावर तो बोलेल तेव्हाच त्याने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title : मोबाइल पर डांट के बाद छात्र ने स्कूल से लगाई छलांग

Web Summary : रतलाम: मोबाइल लाने पर डांटे जाने के बाद आठवीं कक्षा के एक छात्र ने आत्महत्या का प्रयास किया। सीसीटीवी फुटेज में वह बार-बार माफी मांगता दिख रहा है। प्रिंसिपल ने निष्कासन की धमकी दी, जिससे उसने छलांग लगा दी। वह गंभीर रूप से घायल है।

Web Title : Student jumps from school after reprimand for phone use.

Web Summary : Ratlam: An eighth-grader and national skater attempted suicide after being scolded for bringing a phone. CCTV footage shows him begging forgiveness repeatedly. The principal threatened expulsion, leading to the jump. He is critically injured and receiving treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.