नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:17 IST2025-12-31T17:15:38+5:302025-12-31T17:17:14+5:30
२०२५ मधील अत्यंत गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक म्हणजे मेरठचं सौरभ राजपूत हत्याप्रकरण.

नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
२०२५ मधील अत्यंत गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक म्हणजे मेरठचं सौरभ राजपूत हत्याप्रकरण. या खळबळजनक प्रकरणात सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान हिच्यावर असा आरोप आहे की, तिने आपला बॉयफ्रेंड साहिल शुक्ला याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये लपवले. पोलीस तपासानंतर मुस्कान आणि साहिल या दोघांनाही अटक करून मेरठ जिल्हा कारागृहात पाठवण्यात आलं, जिथे ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
चौधरी चरण सिंह विद्यापीठाचा एक विद्यार्थी नेता अक्षय बैंसला वादाच्या एका प्रकरणामुळे मेरठ जिल्हा कारागृहात पोहोचला. अक्षयला त्याच बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं होतं, जिथे सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी साहिल शुक्ला बंद होता. अक्षयच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तो साहिलला ओळखू शकला नाही, कारण अटक झाली तेव्हाच्या तुलनेत तुरुंगातील साहिलचा चेहरामोहरा बराच बदलला होता. नंतर जेव्हा त्याला समजलं की हाच व्यक्ती सौरभ हत्या प्रकरणातील आरोपी आहे, तेव्हा दोघांमध्ये संवाद सुरू झाला.
अक्षयने सांगितलं की, २४ नोव्हेंबर रोजी आपल्या सुनावणीदरम्यान त्याला माहिती मिळाली की मुस्कानने एका मुलीला जन्म दिला आहे. जेलमध्ये परतल्यानंतर जेव्हा त्याने ही गोष्ट साहिलला सांगितली, तेव्हा साहिल म्हणाला की त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी जेव्हा जेलमध्ये वृत्तपत्र आलं, तेव्हा साहिलला कळालं की मुस्कानने मुलीला जन्म दिला आहे आणि तिला तिचं नाव 'राधा' ठेवायचं आहे. जेलमधील इतर कैद्यांनी साहिलचं अभिनंदन करत गंमतीने म्हटलं की, आता त्याने पार्टी दिली पाहिजे. यावर साहिलने उत्तर दिलं की, "आता तुम्ही सर्वजण काका झाला आहात आणि जेव्हा मी जेलबाहेर पडेन, तेव्हा सर्वांना पार्टी देईन."
अक्षयच्या म्हणण्यानुसार, संवादादरम्यान साहिलने असा दावा केला की त्याने सौरभ राजपूतची हत्या केलेली नाही. साहिलचे म्हणणं आहे की, या प्रकरणात असा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही जो हे सिद्ध करू शकेल की हत्या त्यानेच केली आहे. याच आधारावर आपल्याला शिक्षेतून सुटका मिळेल, अशी त्याला आशा आहे. सध्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता, येत्या काही दिवसांत या केसमध्ये निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.