पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 15:37 IST2025-11-23T15:31:14+5:302025-11-23T15:37:28+5:30
बंगळुरुमध्ये एटीएम व्हॅन लुटून पळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ७२ तासांमध्ये अटक केली.

पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
Bangalore ATM Van Robbery: कर्नाटकची राजधानी बंगळूरूमध्ये १९ नोव्हेंबर रोजी एटीएमच्या कॅश व्हॅनमधून ७.११ कोटी रुपयांची दिवसाढवळ्या केलेली लूट पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणली आहे. सहा राज्यांमध्ये २०० हून अधिक पोलीस, सीसीटीव्ही फुटेज आणि फोन डेटाच्या मदतीने पोलिसांनी या हायप्रोफाईल दरोड्याचा छडा लावला. यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, चोरीस गेलेल्या रकमेपैकी ६.२९ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये गोविंदपुरा पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल अण्णप्पा नाईक, कॅश व्हॅन चालवणाऱ्या सीएमएस कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा झेवियर नावाचा माजी कर्मचारी आणि ट्रान्सपोर्ट व्हॅनचा इंचार्ज गोपाल प्रसाद यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत नवीन, नेल्सन आणि रवी या त्यांच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
या टोळीने तीन महिने नियोजन, १५ दिवसांची रेकी, बनावट नंबर प्लेट वापरून अनेक वाहनांचा वापर आणि पकडले जाऊ नये म्हणून व्हॉट्सॲप कॉलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधणे अशा अत्यंत बारकाईने कटाची अंमलबजावणी केली होती. टोळीतील पोलीस कॉन्स्टेबल नाईक याने आरोपींना कोणताही पुरावा न सोडता गुन्हा कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले. तर ट्रान्सपोर्ट इंचार्ज गोपाल प्रसाद याने कॅश व्हॅनच्या प्रवासाची रियल-टाइम माहिती पुरवली. झेवियरने टोळी शहराबाहेर पडल्यावर रोकड ताब्यात घेतली.
फसवणूक करून लूट
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी डेअरी सर्कल फ्लायओव्हरजवळ ही घटना घडली. सीएमएस इन्फो सिस्टम्सची गाडी जेपी नगरमधील एका बँक शाखेतून रोकड घेऊन जात असताना, आरोपींनी भारत सरकारचे स्टिकर लावलेल्या गाडीतून येऊन स्वतःला आरबीआय अधिकारी भासवले. त्यांनी व्हॅन थांबवून कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने रोकडसह आपल्या गाडीत बसवले आणि सुमारे ७.११ कोटी रुपये घेऊन पसार झाले.
गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना उशिरा आणि चुकीच्या ठिकाणी मिळाल्यामुळे तपासासाठी महत्त्वाचा वेळ गमावला गेला. मात्र, पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी तात्काळ ११ पथके नेमली आणि २०० पोलीस अधिकाऱ्यांची टीम या कामाला लावली. सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे बंगळुरूमधील अण्णप्पा, झेवियर आणि गोपाल प्रसाद यांना अटक करून त्यांच्याकडून ५.७६ कोटी रुपये जप्त करण्यात आले.
या तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या इतर तीन साथीदारांना हैदराबादमधील एका लॉजमधून पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून ५३ लाख रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी आता उर्वरित ८२ लाख रुपयांची रोकड आणि टोळीतील उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र केला आहे.
सीएमएस कंपनीच्या परवान्यावर टांगती तलवार
पोलिस आयुक्त सिंग यांनी सीएमएस कंपनीने रोख रक्कम वाहतुकीच्या आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल गंभीर आक्षेप नोंदवला आहे. या निष्काळजीपणामुळे त्यांनी कंपनीचा परवाना रद्द करण्याची शिफारस सरकारकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.