मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:22 IST2025-09-30T10:21:40+5:302025-09-30T10:22:26+5:30
Husband killed Wife news: २७ वर्षीय पत्नीची हत्या करून ३० वर्षीय पतीने गळफास घेतल्याची घटना कर्नाटकातील बंगळुरू शहरात घडली आहे.

मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
Husband Wife Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली. रविवारी (२८ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली असून, पतीने आधी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय मंजू बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची. तिचा पती ३० वर्षीय धर्मशीलम हा दुबईमध्ये कामाला होता. तो तिथे बांधकाम व्यवसायात होता.
मंजू आणि धर्मशीलम यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वीच तो दुबईतून बंगळुरू येथील घरी आला होता. धर्मशीलम, मंजू आणि मंजूचे वडील असे तिघे एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. उल्लाल मेन रोडवर त्यांनी फ्लॅट भाड्याने घेतलेला होता.
मयत मंजूचे वडील पेरियास्वामी (वय ५३) यांनी सांगितले की, मला रात्री अंदाज साडेनऊ वाजेच्या सुमारास मंजूचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. तिच्या शरीरावर चाकूने अनेकदा वार केले गेलेले होते. तशा खुणा दिसल्या. तर धर्मशीलमने दोरीने पंख्याला गळफास घेतलेला दिसला. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता.
मंजू आणि धर्मशीलममध्ये नेमकं काय बिनसलं होतं. याबद्दल मात्र कुणालाही माहिती नाही. ज्ञानभारती पोलिसांनी हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून, पती-पत्नीमध्ये नेमके काय घडलं? याचा तपास सुरू केला आहे.