सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:58 IST2025-10-13T18:54:33+5:302025-10-13T18:58:11+5:30
तो उत्तर प्रदेशातून सौदीला गेला. तिथे असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला. परदेशात असल्यामुळे तो निश्चित होता, पण अखेर तो तावडीत सापडलाच.

सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
उत्तर प्रदेशातील एक तरुण नोकरी करण्यासाठी सौदीमध्ये गेला. तिथे राहत असताना त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसोबत छेडछाड केली. आक्षेपार्ह फोटो तयार करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. परदेशात असल्यामुळे त्याला याची काही जाणीव झाली नाही, पण इकडे उत्तर प्रदेशात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याच्या मागावर होते, अखेर तो जाळ्यात अडकलाच.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरचा हा तरुण सौदी अरेबियामध्ये गेला होता. कुर्बान उर्फ अल्तमस असे तरुणाचे नाव असून, कुल्हाडी गावचा रहिवाशी आहे.
सौदीमध्ये काम करत असताना त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो एडिट केला होता. तो फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मुजफ्फरपूरमधील चरथावल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात २८ सप्टेंबर रोजी तक्रार देण्यात आली होती.
अल्तमसने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटोही तक्रारीसोबत जोडण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ३५३ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला.
भारतात आला आणि बेड्या पडल्या
आरोपी अल्तमस हा रविवारी सौदीवरून भारतात आला. गावी पोहोचताच पोलीस त्याच्या घरी पोहोचले. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक करताच आरोपी गयावया करू लागला. माफी मागू लागला. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली.