अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला अटक, चौकशीतून काय आलं समोर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:52 IST2024-12-26T15:49:56+5:302024-12-26T15:52:15+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निधनाबद्दल एक व्यक्तीने फेक पोस्ट केली होती. त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, ही पोस्ट करण्यामागचं कारण त्याने चौकशीवेळी सांगितले.

अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला अटक, चौकशीतून काय आलं समोर?
Fake News About Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निधन झाल्याची फेक न्यूज पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बुधवारी (२५ डिसेंबर) उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रोहित (वय ३४) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्याचे भाजपचे पदाधिकारी अनिल शर्मा यांनी या फेक न्यूजबद्दलची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अनिल शर्मा यांनी फेसबुकवर अमित शाह यांच्या निधनाची खोटी पोस्ट बघितली. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये आरोपी रोहित विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी दिली.
फेक न्यूज का पोस्ट केली, आरोपीने काय सांगितले?
पोलिसांनी आरोपी रोहितला अटक करून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबूली देताना असे करण्याचे कारणही सांगितले. त्याचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी अमित शाहांबद्दलची फेक न्यूज पोस्ट केली होती.
सिंह यांनी सांगितले की, इंदिरापुरम पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधले. त्यानंतर वसुंधरा कॉलनीमधील हिंडन नदीच्या पुलाजवळ त्याला अटक केली.