लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:35 IST2025-10-10T18:33:42+5:302025-10-10T18:35:41+5:30
गावाने आणि कुटुंबाने भव्य मिरवणूक काढली, हार-फुल देऊन तिचं जंगी स्वागत केलं. पण त्यानंतर सत्य समोर आल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.

लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील एनसीसी विद्यार्थिनीची खूप मोठी फसवणूक करण्यात आली आहे. लष्करात नोकरी देण्याचं आमिष दाखवून तिच्याकडे लाखो रुपयांची मागणी करण्यात आली. लष्करात नेमणूक झाल्याचं विद्यार्थिनीला सांगण्यात आलं. त्यानंतर गावाने आणि कुटुंबाने तिची भव्य मिरवणूक काढली, हार-फुल देऊन तिचं जंगी स्वागत केलं. पण त्यानंतर सत्य समोर आल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
महाराजगंजच्या निचलौल पोलीस स्टेशन परिसरातील डोमा कांती गावातील रहिवासी, बारावीची विद्यार्थिनी आणि एनसीसी कॅडेट असलेल्या नगमाची फसवणूक झाली आहे. नगमाने सांगितलं की, ती माथालर सलेमपूर येथील एनसीसी कॅम्पमध्ये फायरिंग ट्रेनिंगदरम्यान धीरज नावाच्या व्यक्तीला भेटली. धीरजने तो सैन्याशी संबंधित असल्याचा दावा केला आणि त्याची वरपर्यंत ओळख असल्याचं सांगितलं. धीरजने नगमाला सैन्यात भरती करण्याचं आश्वासन देऊन फसवलं.
धीरजने २४ सप्टेंबर रोजी नगमाला गोरखपूरला बोलावलं. तिला लष्कराचा गणवेश देण्यात आला. त्याठिकाणी काही मुलं आणि मुली आधीच उपस्थित होते. त्यांना धावण्यास, मार्च परेड करण्यास आणि व्यायाम करण्यास सांगण्यात आलं. गोरखपूरमधील मेडिकल कॉलेजजवळ ब्लड टेस्ट देखील करण्यात आली. भरतीसाठी २,७०,००० रुपयांची मागणी करण्यात आली.
नगमा आणि इतर कॅडेट्सना राजस्थानमधील पुष्कर येथे नेण्यात आले, जिथे त्यांची ओळख अंगद मिश्रा नावाच्या व्यक्तीशी झाली. पैसे मिळाल्यानंतर, त्यांना सांगण्यात आलं की त्यांना काही महिन्यांत जॉइनिंग लेटर मिळतील. जॉइनिंग लेटर मिळाल्यावर नगमा लष्कराच्या गणवेशात तिच्या गावी परतली. तिच्या कुटुंबाने देशभक्तीपर गाणी लावून आणि हार घालून तिचं भव्यदिव्य स्वागत केलं. पण सत्य समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. निचलौल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.