अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:32 IST2025-09-27T14:31:41+5:302025-09-27T14:32:56+5:30
पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने मुलाच्या घरात घुसून त्याचा जीव घेतला.

फोटो - ndtv.in
मध्य प्रदेशातील धारमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कुक्षी पोलीस स्टेशन हद्दीतील अली गावात एका पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने मुलाच्या घरात घुसून त्याचा जीव घेतला. आरोपी मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी पाच वर्षाच्या विकासची त्याच्याच घरात हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय महेश हा बाईकवरून आला आणि अचानक कालू सिंहच्या घरात घुसला. एकही शब्द न बोलता त्याने घरात असलेलं एक फावड्यासारखं धारदार हत्यार उचललं आणि लहान विकासवर हल्ला केला. यामध्ये मुलाची मान त्याच्या धडापासून वेगळी झाली. त्याने पुन्हा मुलावर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे महेश या कुटुंबाला ओळखत नव्हता.
आईसमोरच ही घटना घडली. आईने तिच्या लाडक्या मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. ती स्वतः जखमी झाली, पण मुलाला वाचवता आलं नाही. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी लगेच घटनास्थळी धावले, त्यांनी आरोपीला पकडलं आणि त्याला मारहाण केली. मुलाच्या मृत्यूमुळे आईला मोठा धक्का बसला. संपूर्ण गाव हादरलं आहे.
धारचे पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या आरोपीचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार आरोपी महेश मानसिकदृष्ट्या आजारी होता. तो अलिराजपूर जिल्ह्यातील जोबट बागडी येथील रहिवासी होता. अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. मुलाच्या हत्येच्या एक तास आधी, आरोपीने जवळच्या दुकानातून सामान चोरण्याचा प्रयत्न केला होता.