"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:00 IST2025-12-30T16:59:45+5:302025-12-30T17:00:38+5:30
इयत्ता ९ वीत शिकणारी एक विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत सापडली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता ९ वीत शिकणारी एक विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत सापडली. तिला तातडीने एसजीपीजीआय ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून ही विद्यार्थिनी शुद्धीवर आलेली नाही आणि तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मुलीच्या आईने आपल्या मुलीच्या मैत्रिणींवर आणि मित्रांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा केवळ रस्ता अपघात नसून एक मोठं कटकारस्थान असावं असा संशय आईने व्यक्त केला आहे.
मुलीची आई नीतू सिंह या आशियाना परिसरात राहतात आणि एका दुकानात काम करतात. त्यांनी सांगितलं की, २५ डिसेंबर रोजी मुलीच्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मुलीला फिरायला पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला नकार दिल्यानंतर दुसऱ्या एका मैत्रिणीने खात्री दिली की, ती स्वतः तिच्यासोबत असेल, त्यानंतर मुलगी मित्रांसोबत बाहेर गेली.
नीतू सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सर्व मित्र-मैत्रिणी आलमबाग येथील फिनिक्स पलासियो मॉलला जातो असे सांगून निघाले होते. मात्र, त्यानंतर सर्वजण विश्वनाथ अकादमी शाळेच्या दिशेने गेले. उशीर झाल्यामुळे आईने मुलीला वारंवार फोन केले. शेवटी मुलीने फोन उचलून सांगितले की, "आम्ही लुलु मॉलजवळ आहोत आणि लवकरच घरी येते." यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच एका मित्राचा फोन आला आणि मुलीचा रस्ता अपघात झाल्याची माहिती दिली. कुटुंबीय तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे त्यांना समजलं की, एका व्यक्तीने मुलीला कारमधून रुग्णालयात आणलं होतं.
आईचा आरोप आहे की, जर हा खरोखर अपघात होता, तर तिच्या मित्रांनी त्वरित पोलीस आणि कुटुंबीयांना कळवायला हवं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या परिसरातील लोकांनाही कोणत्याही अपघाताची माहिती नाही. घटनेनंतर मुलीचे निखिल आणि आयबा खान हे दोन मित्र फरार असल्याचं सांगितलं जात असून ते चौकशीसाठी किंवा विचारपूस करण्यासाठी रुग्णालयातही आले नाहीत.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पीजीआय पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांनी सांगितलं की, करण्यात आलेल्या आरोपांची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. एसीपी गोसाईगंज ऋषभ यादव यांनी सांगितलं की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मेडिकल रिपोर्ट तपासून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.