'वर्दी फाडणं पाप आहे, पोलीस आमचे बाप आहेत'; महिला पोलिसाचे कपडे फाडणाऱ्याची लिपस्टिक लावून काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:31 IST2026-01-06T15:25:11+5:302026-01-06T15:31:23+5:30
छत्तीगडमध्ये एका आंदोलनादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला होता.

'वर्दी फाडणं पाप आहे, पोलीस आमचे बाप आहेत'; महिला पोलिसाचे कपडे फाडणाऱ्याची लिपस्टिक लावून काढली धिंड
Chhattisgarh Crime: पोलिसांच्या वर्दीवर हात टाकणाऱ्या आणि महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला छत्तीसगड पोलिसांनी खाकीची खाक्या दाखवला आहे. २७ डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या तमनार भागात कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कपडे फाडून तिला अर्धनग्न करण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी चित्रसेन साव याला अटक केल्यानंतर, संतप्त महिला पोलिसांनी त्याची भररस्त्यात चपलांचा हार घालून आणि लिपस्टिक लावून धिंड काढली.
तमनार येथील जेपीएल कोळसा खदाणीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने २७ डिसेंबरला हिंसक वळण घेतले होते. यावेळी जमावातील काही उपद्रवी घटकांनी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलिसावर अमानवीय हल्ला केला. नराधमांनी तिचे कपडे फाडले आणि तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत होता. या घटनेने पोलीस दलामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
भरचौकात धिंड; गुढग्यावर बसवून मागायला लावली माफी
मुख्य आरोपी चित्रसेन साव याला पोलिसांनी सोमवारी पडिगावातून बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात नेण्यापूर्वी पोलिसांनी हेमू कलानी चौक ते न्यायालयापर्यंत त्याची धिंड काढण्यात आली. यावेळी महिला पोलिसांचा संताप अनावर झाला होता. महिला पोलिसांनी आरोपीच्या तोंडाला काळे फासले, ओठांना लिपस्टिक लावली आणि त्याला बांगड्या घातल्या. त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्याला शहरातून फिरवण्यात आले. आरोपीला भररस्त्यात “पोलीस हमारी बाप है, वर्दी फाडना पाप है” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच त्याला रस्त्यावरच उठाबशा काढायला लावल्या.
वर्दीचा अपमान करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक झाल्याची बातमी समजताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्रधरनगर पोलीस ठाण्याबाहेर फटाके फोडले. "आमच्या महिला सहकाऱ्याचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही," अशा भावना व्यक्त करत महिला पोलिसांनी केक कापून आनंद साजरा केला. महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी दीपिका निर्मलकर म्हणाल्या की, "ती महिला अधिकारी असो वा सामान्य महिला, त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यांना असाच धडा शिकवला पाहिजे."
आतापर्यंत ६ आरोपी गजाआड
या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी चित्रसेन साव याच्यासह मंगल राठिया आणि चनेश खमरी अशा एकूण ६ जणांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.