एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, युवती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 19:34 IST2020-03-17T19:31:07+5:302020-03-17T19:34:26+5:30

कात्रीने भोसकले : टाकळघाट येथील घटना

Life-threatening attack on a young girl in one-sided love pda | एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, युवती गंभीर जखमी

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, युवती गंभीर जखमी

ठळक मुद्दे मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फार्मसी उघडून साफसफाई करीत असताना आरोपी शुभम राजेंद्र काकडे (२३) रा. गोंडवाना हा तिथे पोहोचला.

टाकळघाट (नागपूर) : एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथे घडली आहे. तरुणीवर हल्ला करणाऱ्या युवकाला स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी बेदम मारहाण करीत पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 


मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गोंडवाना येथे राहणारी २० वर्षीय तरुणी टाकळघाट येथील एका फार्मसीमध्ये साफसफाईचे काम करते. नेहमीप्रमाणे ती मंगळवारी सकाळी तिथे आली. फार्मसी उघडून साफसफाई करीत असताना आरोपी शुभम राजेंद्र काकडे (२३) रा. गोंडवाना हा तिथे पोहोचला. तिथे त्यांच्यात वाद झाला. त्याने फार्मसीच्या आत जात कात्री उचलून तिला खाली पाडले व तिच्यावर वार केला. तरुणीचा ओरडण्याचा आवाज येताच आजूबाजूच्या दुकान मालकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पकडले व फार्मसीच्या बाहेर काढले. लागलीच तरुणीला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तरुणीवर बुटीबोरीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. शुभम हा एमआयडीसी परिसरातील एका बारमध्ये वेटर म्हणून कामाला होता. शुभम आणि तरुणीचे घर गोंडवाना येथे एकाच वस्तीत आहे. या दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. तरुणीचे दोन दिवसाअगोदर साक्षगंध झाले होते. त्यातून नाराज झालेल्या शुभमने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. नागरिकांनी मारहाण केल्यानंतर आरोपीची प्रकृती बिघडली होती. त्याला पोलिसांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Life-threatening attack on a young girl in one-sided love pda