महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 15:16 IST2021-01-20T15:14:24+5:302021-01-20T15:16:44+5:30
बांभोरी पुलाजवळ अपघात, पोलीस कर्मचाऱ्याकडे द्वारदर्शनाला जाताना घडली दुर्घटना

महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा जीव
जळगाव - खराब रस्ते, समांतर रस्त्याचा अभाव यामुळे महामार्गावर सातत्याने अपघात होत असून नागरिकांचा रोष वाढतच चालला आहे. दोन दिवसापूर्वी महामार्गावर अजिंठा चौकाजवळ येवल्याच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा महामार्गावर बांभोरी पुलाजवळ खराब रस्त्यामुळे वाहनाचा कट लागून दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (वय-३७, रा. पाचोरा) हे पोलीस दलातील विधी अधिकारी जागीच ठार झाले तर संदीप भीकन पाटील (३५,रा.पोलीस लाईन) हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सकाळी साडे आठ वाजता हा अपघात झाला.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील यांच्या आईचे निधन झालेले आहे. त्यांचा गंधमुक्तीचा कार्यक्रम बुधवारी पारोळा येथे होता. त्या कार्यक्रमासाठी गोसावी व पाटील हे दुचाकीने जात असताना समोरुन येणाऱ्या वाहनाने दुचाकीला कट मारला व त्यात दोघं जण खाली पडले व त्याचवेळी मागून आलेल्या वाहनाचे टायर गोसावी यांच्या अंगावरुन गेले, असे सांगितले जात आहे. मात्र नेमकी घटना कशी घडली हे ठामपणे कोणीच सांगू शकले नाही. यात संदीप पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.