Lampas looted Rs 18 lakh after breaking into closed house, panic in Dharangaon due to third incident | बंद घर फोडून १८ लाखाचा ऐवज लंपास, तिसऱ्या घटनेमुळे धरणगावात घबराट

बंद घर फोडून १८ लाखाचा ऐवज लंपास, तिसऱ्या घटनेमुळे धरणगावात घबराट

धरणगाव : शहरातील चिंतामणी मोरया परिसरात सोमवारी सकाळी एक बंद घर चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी २८ तोळे सोन्यासह अर्धा किलो चांदीचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम अशी ऐकून १८ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसात या परिसरातील ही तिसरी चोरी आहे.

याबाबत दिलीपकुमार छगनलाल संचेती ५८) यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. दिलीपकुमार संचेती हे आपल्या मुलाबाळांसह चिंतामणी मोरया नगरमध्ये भाड्याने राहतात. पाच दिवसापासून ते राजस्थान येथे आपल्या कुलदैवतच्या दर्शनासाठी गेले होते. 

घराला कुलूप बंद करून गेले असता सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शेजारीच राहणारे वडील छगनलाल संचेती हे सकाळी मुलाच्या घराकडे गेले असता त्यांनी घराचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी ही माहिती मोठा मुलगा महेंद्र संचेती यांना सांगितली. 
तात्काळ यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, पो. कॉ. वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत होते. घरात प्रचंड नासधूस करून कपाटातील लॉकर मधील साहित्य बाहेर फेकलेल्या अवस्थेत होते. सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल चोरून नेले. संचेती हे राजस्थान वरून संध्याकाळी उशिरा आल्यामुळे धरणगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

Web Title: Lampas looted Rs 18 lakh after breaking into closed house, panic in Dharangaon due to third incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.