खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:41 IST2025-09-30T16:12:35+5:302025-09-30T16:41:33+5:30
कोल्हापूरात पतीने कट रचून पत्नीची निर्घृण पद्धतीने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
Kolhapur Crime: कोल्हापुरात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यात पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून करत पळ काढला. हातकणंगलेच्या भादोले-कोरेगाव रस्त्यावर भादोलेच्या हद्दीत प्रशांत पाटील याने कोयत्याने वार करून पत्नी रोहिणी पाटील हिचा निघृण खून केला. हल्ल्याआधी प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली होती. असं असतानाही रोहिणीने अंधारात हातावर वार झेलत वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांतच्या जीवघेण्या हल्ल्यापुढे तिचे काही चालू शकले नाही. प्रशांतने कट रचून रोहिणीला संपवल्याने गावात खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक वादातून भादोले गावात सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात रात्री उशिरा झाली. पती प्रशांत हा खून करून फरार झाला होता. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्यासमवेत तिच्या माहेरी ढवळी येथे तिथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये-जा करत होते. सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटारसायकलने येत होते. रात्री साडेआठ कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ हे दोघे आले असता प्रशांत याने अचानक गाडी थांबवली. त्यानंतर त्याने अचानक रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकली. नेमकं काय घडलं हे रोहिणीला कळलंच नाही. डोळ्यात जळजळ होत असल्याने रोहिणी वेदनेने विव्हळत होती. तितक्यात प्रशांतने कोयता काढला आणि तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली.
अचानक वार झाल्याने रोहिणीला धक्का बसला. तिने अंधारात हाताने वार झेलण्याचा प्रयत्न केला. पण प्रशांतला राग अनावर झाला होता. त्याने रोहिणीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून निघृण खून केला. खून करून तो पळत निघाला आणि भादोले गावात आला. त्याने गावातील लोकांना मी रोहिणीचा खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता पाच-सहा महिने येणार नाही, असं सांगितले. त्यानंतर प्रशांत तिथून पळून गेला. गावातल्या लोकांनाही प्रशांतचा अवतार पाहून धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.