लेकीनेच केली आईची हत्या; फक्त एका सोन्याच्या चेनने उघडले संपूर्ण हत्येचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:41 IST2025-11-26T16:41:20+5:302025-11-26T16:41:34+5:30
केरळमध्ये मुलीनेच प्रियकरासाठी आईची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झालं.

लेकीनेच केली आईची हत्या; फक्त एका सोन्याच्या चेनने उघडले संपूर्ण हत्येचे रहस्य
Kerala Crime:केरळमधील त्रिशूर येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने कथितरित्या आपल्या ७५ वर्षीय वृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटला होता. पण शवविच्छेदन अहवालाने या खुनाचे प्रकरण समोर आले आणि तपासादरम्यान गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याने पोलिसांना महत्त्वाचा सुगावा मिळाला. पोलिसांनी आरोपी मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
रविवार, २३ नोव्हेंबरच्या पहाटे थंगामणी (७५) नावाच्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह शेजाऱ्यांनी एका रिकाम्या प्लॉटमध्ये पाहिला. मृतदेहाच्या चेहऱ्यावर जखमा असल्याने पोलिसांना प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू पडल्यामुळे झाल्याचा संशय होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला.
तपास सुरू असताना, पोलिसांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला. शेजाऱ्यांनी सांगितले की, थंगामणी नेहमीच गळ्यात सोन्याची चेन घालत असत, पण ती मृतदेहाजवळ आढळली नाही. सोन्याची चेन गायब असणे, हा पोलिसांसाठी तपासातील महत्त्वाचा सुगावा ठरला. यानंतर, पोलिसांनी मृत थंगामणी यांची मुलगी संध्या (वय ४५) हिच्याव लक्ष ठेवले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती सध्या आपल्या आईसोबत राहत होती. चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की, संध्याचे जवळच राहणाऱ्या नितीन (२९) नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
पोलिसांनी संध्या आणि नितीन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान संध्याने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, तिला तिचा प्रियकर नितीन याला आर्थिक मदत करायची होती आणि त्यासाठी तिला पैशाची गरज होती. त्यासाठी तिने आपली आई थंगामणी यांच्याकडे गळ्यातील सोन्याची चेन मागितली. मात्र, थंगामणी यांनी चेन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. याच कारणामुळे दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि याचे रूपांतर बाचाबाचीत झाले.
बाचाबाची दरम्यान, संध्याने कथितरित्या आपल्या आईचा गळा दाबला आणि त्यांना जोरात ढकलून दिले. थंगामणी खाली पडल्या आणि त्यांचे डोके जमिनीवर आदळले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर संध्या आणि नितीन यांनी थंगामणी यांचा मृत्यू अपघात वाटावा यासाठी मृतदेह दुसऱ्या ठिकाणी हलवून ते अपघातासारखे भासवण्याचा प्रयत्न केला. मृतदेह सापडल्यावर दोघांनीही त्यांना काही माहिती नसल्याचे नाटक केले. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि गळ्यातील गायब सोन्याची चेन या पुराव्यांमुळे अखेर दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.