Video - ४८ तासांत २० लाख व्ह्यूज अन् निष्पाप व्यक्तीचा गेला जीव; महिला इन्फ्लुएन्सरला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:52 IST2026-01-22T11:50:37+5:302026-01-22T11:52:11+5:30
सोशल मीडियावर एका महिलेने बसमधील सहप्रवाशाचा व्हिडीओ बनवला आणि तो आपल्याला चुकीचा स्पर्श करत असल्याचा आरोप केला.

Video - ४८ तासांत २० लाख व्ह्यूज अन् निष्पाप व्यक्तीचा गेला जीव; महिला इन्फ्लुएन्सरला बेड्या
केरळमधील कोझिकोडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एका महिलेने बसमधील सहप्रवाशाचा व्हिडीओ बनवला आणि तो आपल्याला चुकीचा स्पर्श करत असल्याचा आरोप केला. अवघ्या ४८ तासांत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि २० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला. संबंधित व्यक्तीने जेव्हा हा व्हिडीओ पाहिला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये ती व्यक्ती गैरवर्तन करत असल्याचं कुठेही दिसत नव्हतं, मात्र बदनामीच्या भीतीने त्या व्यक्तीने आत्महत्या केली. आता याप्रकरणी संबंधित आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आता शिमजिथा मुस्तफा नावाच्या महिलेलाआत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, शिमजिथाने ४२ वर्षीय यू. दीपक यांच्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप करून त्यांचं 'पब्लिक ट्रायल' केलं होतं.
शिमजिथाने एका खासगी बसमध्ये प्रवासादरम्यान दीपक यांचा व्हिडीओ बनवला आणि त्यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत तो सोशल मीडियावर अपलोड केला. अवघ्या ४८ तासांत तो व्हिडीओ २० लाख वेळा पाहिला गेला. बघता बघता ऑनलाइन विश्वात दीपक यांना 'गुन्हेगार' ठरवण्यात आलं. कोणतीही चौकशी किंवा सत्यता न पडताळता लोकांनी दीपक यांचा मानसिक छळ सुरू केला. हा सार्वजनिक अपमान आणि बदनामीचे ओझं दीपक सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी आपल्या बेडरूममध्ये फाशी घेऊन आयुष्य संपवलं.
केरल में 41 वर्षीय दीपक की आत्महत्या मामले में पुलिस ने 35 वर्षीय शिमजिथा मुस्तफा को एक रिश्तेदार के घर से गिरफ्तार कर जेल भेज दिया। शिमजिथा ने बस यात्रा के दौरान दीपक पर बैड टच का आरोप लगाते हुए एक वीडियो सोशल मीडिया पर पोस्ट किया था। वीडियो वायरल होने के बाद दीपक ने सुसाइड कर… pic.twitter.com/HKF2jdbdW8
— iMayankofficial 🇮🇳 (@imayankindian) January 21, 2026
CCTV मुळे खोटेपणा उघड
दीपक यांच्या मृत्यूनंतर जेव्हा पोलिसांनी बसचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि बस कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले, तेव्हा सत्य समोर आलं. फुटेजमध्ये छळाचा कोणताही प्रकार दिसून आला नाही. बस कर्मचाऱ्यांनीही शिमजिथाचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. पोलीस तपासात हे स्पष्ट झाले की, शिमजिथाने पोलिसात तक्रार करण्याऐवजी थेट व्हिडीओ व्हायरल केला होता, जे तिच्या चुकीच्या हेतूचं किंवा घाईचं लक्षण आहे.
अटक आणि कायदेशीर कारवाई
दीपक यांच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता, तेव्हापासून शिमजिथा फरार होती. तिने आपला मोबाईल बंद केला होता आणि ती अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होती. ती परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी केली होती. अखेर बुधवारी पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ही एखादी पूर्वनियोजित कट-कारस्थान होतं का, हे शोधण्यासाठी आता तिच्या डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.