सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:22 IST2025-12-22T12:21:28+5:302025-12-22T12:22:31+5:30
प्रेमविवाहामुळे संतापलेल्या एका पित्याने आपल्या गर्भवती मुलीची निर्घृण हत्या केली आहे.

सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
कर्नाटकमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रेमविवाहामुळे संतापलेल्या एका पित्याने आपल्या गर्भवती मुलीची निर्घृण हत्या केली आहे. सात महिन्यांपूर्वी तरुणीने दुसऱ्या जातीतील तरुणाशी लग्न केलं होतं, जो निर्णय तिच्या वडिलांना मान्य नव्हता. याच रागातून ही हत्या करण्यात आली. हुबळी येथील इनापूर गावात ही घटना घडली.
मान्या पाटील असं मृत तरुणीचं नाव असून ती नुकतीच गावात परतली होती. त्यावेळी आरोपी पित्याने लोखंडाच्या रॉडने बेदम मारहाण करून आपल्याच मुलीचा जीव घेतला. या गुन्ह्यात पित्यासोबत इतर काही जणांचाही सहभाग असल्याचं समोर येत आहे. जेव्हा मान्याच्या सासरच्या मंडळींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र मान्याचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
७ महिन्यांपूर्वी केलं होतं लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, मान्या पाटील हिने याच वर्षी मे महिन्यात लग्न केलं होतं. तिच्या कुटुंबीयांनी या लग्नाला जोरदार विरोध दर्शवला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचं लक्षात येताच पती-पत्नी अनेक महिने हावेरी जिल्ह्यात राहायला गेले होते. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबांची बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. सामोपचाराने प्रश्न सुटला असं वाटल्याने ८ डिसेंबर रोजी मान्या पतीसह गावात परतली होती.
३ आरोपी ताब्यात, तपास सुरू
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी प्रकाश, वीराणा आणि अरुण या तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांमध्ये मान्या पाटीलचे वडील आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.