बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं... १० लाखांसाठी अमानुष छळ; २४ वर्षीय कीर्तीने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:23 IST2026-01-27T16:22:05+5:302026-01-27T16:23:29+5:30

हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.

karnataka 24 year woman end life in bengaluru over husband family for dowry | बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं... १० लाखांसाठी अमानुष छळ; २४ वर्षीय कीर्तीने संपवलं जीवन

फोटो - asianetnews

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका महिलेने आत्महत्या केली. पती आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. असा आरोप आहे की, तिचा पती तिला कधी बाथरूममध्ये कोंडून ठेवत असे, तर कधी तिला बेदम मारहाण करत असे. पती आणि सासरचे लोक तिच्याकडे लाखो रुपयांची मागणी करत होते.

बंगळुरूच्या तुमकूर जिल्ह्यातील येदियूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कीर्ती श्री असं या महिलेचं नाव आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि आता तिने स्वतःला संपवलं आहे. कीर्तीचा तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. याच त्रासामुळे तिने आत्महत्या केली, ज्यानंतर कीर्तीच्या कुटुंबीयांनी बनाशंकरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कीर्ती मूळची तुमकूरच्या मधुगिरी तालुक्यातील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचं लग्न गुरुप्रसाद याच्याशी झालं होतं. या लग्नात सुमारे ३५ लाख रुपये खर्च झाले होते, ज्यात ४०० ग्रॅम सोनं आणि ५ लाख रुपये रोख रकमेचा समावेश होता. इतकं देऊनही कीर्ती श्रीचा पती गुरुप्रसाद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य सातत्याने पैशांसाठी तिला त्रास देत राहिले. म्हणूनच कीर्ती श्रीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला आहे.

सासरच्या मंडळींच्या आणि पतीच्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या आई-वडिलांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर कीर्तीच्या कुटुंबीयांनी वाद सोडवण्यासाठी गुरुप्रसादच्या घरी तीन वेळा पंचायतही बोलावली होती. मात्र त्यानंतरही सासरच्या लोकांचा छळ थांबला नाही, उलट तो अधिकच वाढला. कीर्तीचा पती तिला शारीरिक वेदना देत असे. 

कीर्तीच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी तिच्यावर १० लाख रुपये आणण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. कीर्तीच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की त्यांनी ८ लाख रुपये दिलेही होते, तरीही सासरच्यांनी तिला त्रास देणं सुरूच ठेवलं. त्यामुळेच ते कीर्तीच्या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या मानत आहेत. पती गुरुप्रसाद आणि तिच्या सासरच्या लोकांनीच तिची हत्या केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Web Title: karnataka 24 year woman end life in bengaluru over husband family for dowry