बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:39 IST2025-11-13T18:38:15+5:302025-11-13T18:39:54+5:30
एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित जमिनीचा आणि शेतीचा वाद रक्तरंजित घटनेत रूपांतरित झाला. बबीना पोलीस स्टेशन हद्दीतील मुखियानगर गावात एका पुतण्याने त्याच्या आईसह मिळून काकाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्यांनी मृतदेह त्यांच्या घरामागील जंगलात लपवून ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
५५ वर्षीय शीला देवी दुपारी शेतात काम करण्यासाठी गेली होती पण संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबाने रात्रभर तिचा शोध घेतला पण तिचा पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी गावकऱ्यांना घरामागील जंगलात दुर्गंधी आली. शोध घेतल्यानंतर शीलाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने खोलवर जखमा होत्या आणि तिचे हात साडीने बांधलेले होते.
मृतदेहावरून स्पष्टपणे दिसून येत होतं की, तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला, तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हत्येचा आरोप केला. कुटुंबांमध्ये शेतीच्या आणि जमिनीच्या वाटणीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. आरोपीने काही दिवसांपूर्वी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली आणि तपास सुरू केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी मीरा देवी आणि तिचा मुलगा ब्रिजलाल रायकवार यांना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटना उघड केली. पोलीस चौकशीत ब्रिजलालने सांगितलं की, जमिनीच्या वाटणीवरून त्याचं काका-काकीसोबत वारंवार भांडण होत होतं. त्यांनी ब्रिजलालचा अपमान केला होता.
संतापलेल्या, अपमानित झालेल्या ब्रिजलालने आणि त्याच्या आईने त्याची काकू शीलाची हत्या करण्याचा कट रचला. १० नोव्हेंबर रोजी दुपारी शीला शेतात जात असताना, दोघांनी तिला थांबवलं आणि जंगलात घेऊन गेले. तिथे ब्रिजलालने तिचे हात साडीने बांधले. तिच्या मानेवर आणि शरीरावर विळ्याने वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेह एका खड्ड्यात फेकून दिला.