एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:26 IST2024-10-10T14:26:06+5:302024-10-10T14:26:56+5:30
Javed Meerpuria Arrested: लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
Javed Meerpuria Arrested: गाझियाबाद : जावेद मीरपुरिया दुबईहून भारतात परतला असून त्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. जावेद मीरपुरिया हा देशातील मोबाईल टॉवरचे आरआर युनिट चोरून चीनसह इतर देशांमध्ये विकत होता. गाझियाबाद पोलिसांनी त्याच्यावर १ लाखांचे बक्षीस जाहीर केलं होतं. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.
जावेद हा दिल्लीतील मुस्तफाबादचा रहिवासी
दिल्लीतील मुस्तफाबादमधील जावेद मीरपुरिया हा आधी भंगार विक्रेता म्हणून काम करत होता. त्यानंतर त्यानं एक टोळी तयार करून चोऱ्या करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मोबाईल टॉवरचे रेडिओ रिसीव्हर युनिट व इतर उपकरणं चोरण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याची तयारी केली. मात्र, तोपर्यंत तो दुबईला गेला आणि तिथून टोळी चालवली.
मोबाइल टॉवर उपकरणे चोरी करण्यासाठी वापरले
या टोळीत त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश होता, गाझियाबाद येथे जावेद मीरपुरियाच्या टोळीतील सदस्यांना मोबाईल टॉवरच्या उपकरणांच्या चोरीच्या प्रकरणात पकडले असता त्याचे नाव समोर आले होते. देशात विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या उपकरणांची चोरीच्या घटनेत त्याचा हात असल्याचेही समोर आले होते.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केली अटक
या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी जावेदच्या २० साथीदारांना अटक केली होती. तसंच, जावेद मीरपुरियाला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम राबवली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मंगळवारी रात्री दुबईहून भारतात परतला आणि माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला अटक केली.
दिल्ली पोलिसांनी गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले
दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर गाझियाबाद पोलीस दिल्ली पोहोचले आणि त्याला ट्रान्झिट रिमांडवर गाझियाबादला नेले. याला दुजोरा देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक अब्दुर रहमान सिद्दीकी यांनी सांगितलं की, जावेदविरुद्ध नंदग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी त्याची ट्रान्झिट रिमांडवर चौकशी करण्यात येत आहे.