जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:28 IST2025-12-27T19:27:36+5:302025-12-27T19:28:15+5:30
Jalgaon Crime: जामनेर तालुक्यातील मोराड गावातील धक्कादायक घटना

जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मोराड या गावात एक धक्कादायक आणि समाजमन सुन्न करणारी घटना घडली. तीन मुलींच्या नंतर पुन्हा चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्याने तीन दिवसांच्या नवजात मुलीचीच हत्या केली. ही घटना १४ नोव्हेंबरला घडली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.
चिमुकलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १४ नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून ठणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सखोल तपास केला. तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड या पित्यानेच चौथी मुलगी झाल्याच्या रागातून तिची हत्या केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.