जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
By विजय.सैतवाल | Updated: October 23, 2025 15:15 IST2025-10-23T15:14:23+5:302025-10-23T15:15:08+5:30
Jalgaon Crime News: स्टेजजवळ नाचून त्याने गायकाच्या अंगावर ओवाळणी म्हणून नोटांची उधळण केली.

जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
Jalgaon Crime News | लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: येथील पोलिस मुख्यालय परिसरातील पद्मालय पोलिस हॉलमध्ये आयोजित दिवाळी सुफी नाईट या कार्यक्रमामध्ये कमरेला पिस्तूल लावून पैशाची उधळण करणाऱ्या पियुष मण्यार (रा. जळगाव) याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील पद्मालय पोलिस हॉल येथे दिवाळी सुफी नाईट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पियुष मण्यार हा कमरेला पिस्तूल लावून ते नीट दिसेल असा पांढरा शर्ट घालून कार्यक्रमात आला होता. या ठिकाणी स्टेजजवळ नाचून त्याने गायकाच्या अंगावर ओवाळणी म्हणून नोटांची उधळण केली.
हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी फिर्याद दिली. पिस्तूल परवानाचे नियम माहित असतानादेखील पिस्तूल दिसेल असे पांढरे शर्ट घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. त्यावरून २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पियुष मण्यार याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३० व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.