पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 21:56 IST2025-06-30T21:53:42+5:302025-06-30T21:56:34+5:30
राजस्थानमध्ये एका जोडप्याने एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट
Jaipur Couple Suicide:राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका खाजगी बँक विमा कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह त्यांच्या फ्लॅटच्या एका खोलीत आढळले. सुरुवातीला पती-पत्नीने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालं नव्हतं. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे पती-पत्नीने आत्महत्या करण्यासाठी एकाच गळफासाचा वापर केला. जयपूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जयपूरमध्ये खाजगी विमा कंपनीचे व्यवस्थापक धर्मेंद्र चौधरी (४०) आणि त्यांची पत्नी सुमन चौधरी (३६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दादुदयल नगर येथील राधा राणी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही भांडत असल्याचे समोर आलं.
इमारतीच्या पार्किंगच्या सीसीटीव्हीमध्ये धर्मेंद्र गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, तर सुमन त्यांना थांबवत होती. सुमन धर्मेंद्रजवळ जाऊन उभी होती आणि त्याला गाडी सुरू करू देत नव्हती. यानंतर धर्मेंद्रने सुमनला बाजूला ढकलले आणि गाडी मागे घेतली. पण सुमन त्याला जाऊ देत नव्हती. आणखी एका सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती-पत्नी इमारतीत एकत्र प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर कोणीही त्यांना पाहिले नाही. या व्हिडिओमध्ये सुमनच्या हातात बॅग होती.
शुक्रवारी, जेव्हा धर्मेंद्र बँकेत गेला नाही आणि त्याने सहकाऱ्यांचे फोन उचलले नाही तेव्हा त्यांच्या एका मित्राला याची माहिती देण्यात आली. मित्राची मुलगी फ्लॅटवर पोहोचली आणि दरवाजा ठोठावला. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा ढकलताच तो उघडला. मुलीने धर्मेंद्रचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिला, तर सुमनचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले.
सुमन स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती, तर धर्मेंद्र एका खाजगी बँकेच्या विमा युनिटमध्ये व्यवस्थापक होता. दोघांनाही ११ आणि ८ वर्षांच्या दोन मुली आहेत. दोघेही त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहतात. दोघेही पूर्वी भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन फ्लॅट खरेदी केला होता.