बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:54 IST2025-08-19T15:54:32+5:302025-08-19T15:54:47+5:30
एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एक धक्कादायक कट रचला. तिने आपल्या मुलीचे लग्न तिच्याच प्रियकराशी लावले.

बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्..
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एक धक्कादायक कट रचला. तिने आपल्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्याच प्रियकराशी लावले. एवढंच नाही, तर त्यानंतर या प्रियकरासोबत आणि मेहुण्यासोबत मिळून तिने स्वतःच्याच पतीचा गळा चिरून खून केला.
काय आहे संपूर्ण घटना?
मुरलीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खाडी गावात ही घटना घडली. एका महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध लपवण्यासाठी आणि प्रियकरासोबत राहता यावे, यासाठी तिने आपली १२ वर्षांची मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यात लग्न लावून दिले. अशा प्रकारे तिने प्रियकरालाच आपला जावई बनवले.
यानंतर ही महिला पतीकडे जमिनीचा तुकडा जावयाच्या नावावर करण्याची मागणी करत होती. पण तिचा पती, जसवंत यादव, यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तिने पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. महिलेने तिच्या प्रियकर आणि मेहुण्यासोबत मिळून पतीची हत्या केली. तिने जसवंतला एका बहाण्याने घराबाहेर बोलावले आणि तिघांनी मिळून त्याचा गळा चिरला. नंतर त्याचा मृतदेह गावापासून ५ किलोमीटर दूर एका शेतात फेकून दिला.
सासूने केला पोलिसांत गुन्हा दाखल
मृत जसवंत यादव यांच्या आईने, उर्मिला देवी यांनी मुरलीगंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची सून पुनीता देवी हिने जावई अमित कुमार आणि मेहुणा राजेश यादव यांच्यासोबत मिळून त्यांच्या मुलाची हत्या केली. जसवंतचा मृतदेह बेलो पिपराही गावात सापडला. उर्मिला देवींच्या म्हणण्यानुसार, सुनेच्या अनैतिक संबंधांबद्दल मुलाला कळले होते, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
पोलीस तपास आणि आरोपींना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी पुनीता ही तिचा प्रियकर अमित आणि मुलीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. जसवंतला तिच्या अनैतिक संबंधांबद्दल कळल्यानंतर त्यांच्यात मागील तीन वर्षांपासून वाद सुरू होता. जेव्हा जसवंतने जमिनी नावावर करण्याची मागणी नाकारली, तेव्हा तिने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली.
जसवंतचा मृतदेह सोमवारी सकाळी काही गावकऱ्यांना शेतात दिसला, तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी तात्काळ आरोपी पत्नी पुनीता, तिचा मेहुणा राजेश आणि प्रियकर अमितला अटक केली आहे. या हत्येत सामील असलेल्या आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू आहे.