२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:22 IST2025-07-02T09:20:37+5:302025-07-02T09:22:52+5:30
या आरोपीने आसाम, मेघालय, दिल्ली, गाझियाबाद, बुलंदशहर आणि मुझफ्फरनगरच्या अनेक महिला, युवतींची फसवणूक केली होती.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे पोलिसंनी युवती आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बनावट पोलीस शिपायाला अटक केली आहे. आरोपी युवक पोलिसांचा गणवेश घालून महिलांना त्याच्याकडे आकर्षित करायचा. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून दागिने आणि पैसे लुटायचा. या आरोपीच्या अनेक शहरात २० हून अधिक गर्लफ्रेंड आहेत आणि त्यातील १० जणींसोबत त्याने शारीरिक संबंधही बनवले आहेत. एका महिलेने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आरोपी युवकाला पकडण्यात आले. त्यावेळी तपासात हा खुलासा झाला.
या आरोपीकडून पोलिसांचा गणवेश, मोबाईल आणि त्यात अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा म्हणाले की, एका महिलेने शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात आरोपी नौशाद त्यागी उर्फ रिक्की त्यागी हा स्वत:ला पोलीस असल्याचे भासवत महिला आणि युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. आरोपीने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून २ लाख ७५ हजार रोकड आणि ३ लाखांचे दागिने घेतले होते. ही तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी युवकाला तात्काळ अटक केली असं त्यांनी सांगितले.
या आरोपीने आसाम, मेघालय, दिल्ली, गाझियाबाद, बुलंदशहर आणि मुझफ्फरनगरच्या अनेक महिला, युवतींची फसवणूक केली होती. या मुलींना प्रेमात ओढून त्यांना लग्नाची खोटी स्वप्ने दाखवत होता. त्यानंतर हा त्यांच्याकडून रोकड, दागिने हडप करायचा. गावात त्याने स्वत:ला पोलीस असल्याचं दाखवत धाक निर्माण केला होता. या पीडित मुलींमध्ये काही महिला पोलिसांचाही समावेश आहे. मागील ३ वर्षापासून तो महिलांना त्याच्या वासनेचा बळी बनवत आहे. यातील बहुतांश महिला ज्या विधवा आहेत किंवा पतीपासून विभक्त राहतात त्यांना तो हेरायचा आणि प्रेमात फसवणूक करत होता असं तपासात पुढे आले.
दरम्यान, पोलिसांनी जेव्हा आरोपी युवकाला पकडले. त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासला असता त्यात अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. त्याच्या २० हून अधिक गर्लफ्रेंड होत्या. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने १० मुलींसोबत शारीरिक संबंधही बनवले. पोलिसांनी त्याचा मोबाईल पुरावा म्हणून जप्त केला असून या घटनेतील अन्य पीडित महिलांनाही पुढे आणून तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
पोलीस मित्राचा गणवेश चोरला
आरोपीने ३ वर्षापूर्वी संभलमध्ये तैनात असलेल्या त्याच्या मित्राचा पोलीस गणवेश चोरला होता. त्याचा सहकारी पोलीस विभागात कार्यरत आहे. तो निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गेला होता. तेव्हा आरोपीने त्याचा गणवेश चोरला. त्यानंतर स्वत:ला पोलीस असल्याचं दाखवत तो महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढू लागला. अटक केलेल्या आरोपीपासून पोलीस गणवेश, सीटी दोरी, उत्तर प्रदेश पोलीस बॅच, बेल्ट, नेमप्लेट आणि एक पोलीस टोपीही जप्त करण्यात आली आहे.