थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:38 IST2025-08-08T11:37:22+5:302025-08-08T11:38:00+5:30
शरण यांचे भाऊ विष्णू हंडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अमित सुरवसेसह अज्ञात ४-५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
सोलापूर - राजकीय वैमनस्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांना घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना घडली आहे. अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करत आरोपींचा कर्नाटकातील झळकी येथे शोध घेत रात्री ११ वाजता सोलापूरात आणले. या प्रकरणी अमित सुरवसे याच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शरणू हांडे साईनगरमधील एका बियर शॉपी परिसरात थांबलेले असताना चार ते पाच जण अचानक आले आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर हांडे यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून नेले. आरोपींनी अपहरण करून सुरुवातीला हांडे यांना अक्कलकोट रोडकडे नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा कर्नाटकच्या दिशेने वळवला. याचवेळी पोलिसांनी पाठलाग करून अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. याबाबत शरण यांचे भाऊ विष्णू हांडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अमित सुरवसेसह अज्ञात ४-५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा समजला. त्यावरून कुणकुण लागताच पोलिसांचे एक पथक झळकी येथे पोहचले. तिथे चौघांना ताब्यात घेण्यात आले. शरण हांडे यांच्या मांडीवर खोल जखम झाली असून जवळपास ५ टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शरणू यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना हात पाय बांधून गाडीत नेले. गाडीत त्यांना खूप मारहाण करण्यात आली. त्यात शरणू यांच्या छातीवर व शरीराच्या इतर भागांवर हॉकी स्टीकने मारहाण झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. या प्रकारानंतर रात्री पडळकर समर्थकांनी शासकीय रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला होता.
जुन्या रागातून घेतला बदला?
आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूरात आल्यानंतर ३० जून २०११ मध्ये त्यांच्या गाडीवर दगड मारून काच फोडली होती. या घटनेनंतर शरणू हांडे आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. याचा राग मनात ठेवून हांडे यांचे अपहरण झाले असल्याचं मानले जाते.